पोलिसांनी काढले अनधिकृत फलक, झेंडे
By Admin | Updated: January 7, 2015 01:26 IST2015-01-07T01:26:54+5:302015-01-07T01:26:54+5:30
अकोल्यात अनधिकृत फलक, बॅनर काढण्याची विशेष मोहीम सुरू.

पोलिसांनी काढले अनधिकृत फलक, झेंडे
अकोला : साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास अनधिकृत फलक, बॅनर काढण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील सर्वच रस्त्यांवर, विद्युत खांबांवर, इमारतींवर लागलेले अनधिकृत फलक, बॅनरसोबतच हिरवे, केशरी व निळय़ा रंगाचे झेंडे मंगळवारी पोलिसांनी काढले. डॉ. मुंढे यांनी सोमवारी महापालिकेच्या मदतीने शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेले राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटना आणि व्यापार्यांचे फलक, होर्डिंग, बॅनर आणि झेंडे काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस, आरसीपीचे जवान, अग्निशमन दल, गजराजच्या मदतीने टिळक रोड ते आकोट स्टँड चौक, आकोट स्टँड चौक ते सुभाष चौक, दीपक चौक, संतोषी माता चौक ते रेल्वे स्टेशन चौक आदी भागांतील रस्ते, इमारती, विद्युत खांबांवर लावलेले अनधिकृत फलक, बॅनर, होर्डिंग आणि विविध प्रकारचे झेंडे काढून टाकण्यात आले. परवानगी असलेल्या बॅनर, होर्डिंग व फलकांवर पोलीस पथकाने कारवाई केली नाही. गत काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर अनधिकृत फलक, बॅनर, होर्डिंग, झेंडे आणि भगव्या व हिरव्या पताका लावण्याची स्पर्धाच लागली आहे. एकप्रकारे या फलक, बॅनर, झेंड्यांमुळे शहर विद्रुप झाले. या फलक, बॅनरवर मंदिर, मशिदींसोबत देवता, थोर महापुरुषांची छायाचित्रे असल्याने त्यांची विटंबना केल्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे शहरात तणावही निर्माण झाला होता. या दृष्टिकोनातूनच सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली.