unauthorized hoardings; municipal corporation loss revenue | अनधिकृत होर्डिंग्समुळे महापालिकेला लाखोचा फटका
अनधिकृत होर्डिंग्समुळे महापालिकेला लाखोचा फटका


अकोला: मुख्य मार्ग, चौक असो वा विद्युत खांब, वाणिज्यिक जाहिरातीचे फलक, होर्डिंग्सने भरगच्च भरलेले आहेत. यातील बहुतांश फलक व बॅनर महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील मुख्य चौकांमध्ये तसेच मार्गावर विविध प्रतिष्ठांनांच्या वाणिज्यिक जाहिरातींचे बॅनर व फलक लावण्यात येत आहेत. यातील बहुतांश फलक विनापरवानगी विद्युत खांबावर लावण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेला हाताशी घेतल्याचा आरोप यापूर्वी शहरातील महासभेत तथा स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केला आहे. शहरात ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्समुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून, त्यामुळे महापालिका प्रशासनाला कुठल्याच प्रकारचे उत्पन्न मिळत नाही. लाखो रुपयांचा फटका बसत असला तरी मनपा प्रशासन त्या विरोधात कुठलीच कार्यवाही करत नसल्याने शहराच्या विद्रुपीकरणाचा हा प्रकार झपाट्याने वाढत आहे; मात्र मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याऐवजी संबंधित विभागाचे कर्मचारी स्वहिताकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी घेण्याची गरज असून, अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अतिक्रमण विभाग ठरतोय निष्क्रिय
शहरातील सर्वच फलक, बॅनर आणि होर्डिंग्सची नोंद केली, तर अनेक मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे; परंतु यातील बहुतांश होर्डिंग्स व बॅनरला परवानगी नसल्याची माहिती असूनही त्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभाग कार्यवाही करत नसल्याने निष्क्रिय ठरत आहे.
 

शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंग्सची संपूर्ण माहिती घेऊन अनधिकृत फलक, होर्डिंग्सवर कारवाई करणार. शिवाय त्यांना परवानगी कशा पद्धतीने देण्यात आली, फलकाच्या करारनाम्याबद्दल माहिती घेऊन चौकशी करू. तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- संजय कापडणीस, आयुक्त, महापालिका, अकोला

 

Web Title: unauthorized hoardings; municipal corporation loss revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.