विनाअनुदानित शाळा मोफत आरोग्य तपासणीतूनही गायब

By Admin | Updated: July 18, 2015 01:22 IST2015-07-18T01:22:41+5:302015-07-18T01:22:41+5:30

विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून वंचित.

Unaided schools also disappear from the free health check-up | विनाअनुदानित शाळा मोफत आरोग्य तपासणीतूनही गायब

विनाअनुदानित शाळा मोफत आरोग्य तपासणीतूनही गायब

विवेकानंद ठाकरे/रिसोड (वाशिम): आरोग्य विभागातर्फे दरवर्षी होणारी मोफत आरोग्य तपासणी यावर्षी विनाअनुदानित शाळांमध्ये होणार नसल्याने, या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीपासून वंचित राहावे लागणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व सर्व शिक्षा मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील पहिली ते दहावी आणि शहरी भागातील पहिली ते चवथीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांमधील गंभीर आजार शोधून त्यावर मोफत उपचार करण्यासाठी शालेय आरोग्य तपासणी मोहीम २00८-0९ पासून राज्यभर सुरू आहे. आतापर्यंंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून विद्यार्थ्यांंमधील मानसिक, मेंदुविकार, रक्तक्षय, रक्ताभिसरण, हृदयरोग, कर्करोग, नेत्ररोग, कर्णरोग, श्‍वासोछ्वास, त्वचारोग, अस्थिरोग, पचनक्रिया, दंतक्षय आदी गंभीर आजाराचे निदान झाले होते. अनुदानित, विनाअनुदानित अशा दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी या मोहिमेंतर्गत मोफत केली जात होती; मात्र या वर्षीपासून विनाअनुदानित शाळा मोफत आरोग्य तपासणीपासून वगळण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे. शासन विनाअनुदानीत शाळांना शालेय पोषण आहार, मोफत पाठयपुस्तके, गणवेश, शिक्षक अनुदान, प्रोत्साहन भत्ता, प्रशिक्षण यापासून दूर ठेवत आहे. आता विद्यार्थ्यांंच्या आरोग्य तपासणीलाही खो दिला जात आहे.
राज्यात २ हजार प्राथमिक आणि २0८५ माध्यमिक शाळा विनाअनुदानीत तत्वावर सन २000-0१ पासून सुरु आहेत. पंधरा वर्षापासून विनाअनुदानीत शाळांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात नाही; मात्र विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांंना चालू शैक्षणिक वर्षापासून आरोग्य तपासणीपासूनही वंचित ठेवले जात असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Unaided schools also disappear from the free health check-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.