भ्रष्टाचाराची तरुणाईला चिड!
By Admin | Updated: August 2, 2016 00:12 IST2016-08-02T00:12:43+5:302016-08-02T00:12:43+5:30
लाचखोरांच्या तक्रारी करण्यात तरुणाई आघाडीवर; भ्रष्टाचारात महसूल व पोलीस खाते आघाडीवर.

भ्रष्टाचाराची तरुणाईला चिड!
अकोला: तरुणाईचा स्वभाव अन्यायाविरुद्ध लढण्याचा आहे. अन्याय, भ्रष्टाचार, अप्रामाणिकता याविषयी तरुणाईच्या मनात प्रचंड राग आहे. तो तक्रारींच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी तरुणाई सोडत नसल्याचे दिसून येते. गत दोन वर्षांमध्ये लाचखोरांविरुद्ध तरुणाई चांगलीच सरसावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार्यांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दोन वर्षांमध्ये २६ ते ३५ वर्षे वयोगटातील ६७२ युवकांनी लाचखोरांविरुद्ध तक्रारी नोंदविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. महिलांचे हे प्रमाण केवळ तीन टक्के आहे.
शासनाकडून भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने जनजागृती सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या किडीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेसुद्धा कामामध्ये गती आणत, कारवाया वाढविल्या आहेत. २0१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२४५ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या, तर २0१५ मध्ये १२३४, २0१६ मध्ये ७६३ लाचखोरांना गजाआड केले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. आपल्या तक्रारींमधून भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची वृत्ती तरुणाईमध्ये दिसून येत आहे. २0१४ मध्ये लाचखोरांविरुद्ध तक्रार करणार्या युवकांची संख्या ३३८ होती, तर गतवर्षी २0१५ मध्ये त्यात आणखी वाढ झाली. २0१५ मध्ये ३६१, २0१६ मध्ये ३११ युवकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी नोंदविल्या. वृद्धांमध्ये मात्र लाचखोरांविरुद्ध तक्रारी करण्याबाबत उदासीनता दिसून येते. वृद्धांचे तक्रार करण्याचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांमध्येही तक्रार करण्याचे प्रमाण १२ टक्के एवढे लक्षणीय असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
तक्रारदारांची वयानुसार वर्गवारी
वय तक्रारदार
२५ वर्षांपेक्षा कमी १३२
२६ ते ३५ वर्षे ३११
३६ ते ४५ वर्षे २८९
४६ ते ६0 वर्षे १८0
६0 वर्षांपेक्षा अधिक ३७
भ्रष्टाचारामध्ये महसूल व पोलीस खाते पहिल्या व द्वितीय स्थानावर आहे. २0१६ मधील सात महिन्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६0२ सापळे लावून, विविध विभागातील ७६३ लाचखोरांना अटक केली. यामध्ये महसूल विभागातील १७७, तर पोलीस विभागातील १६७ लाचखोरांना गजाआड करण्यात आले.