उद्धव ठाकरेंपुढे गुंजला ‘शेतकरी कर्जमुक्ती’चा नारा!
By Admin | Updated: May 16, 2017 02:14 IST2017-05-16T02:14:14+5:302017-05-16T02:14:14+5:30
शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी दिल्या घोषणा

उद्धव ठाकरेंपुढे गुंजला ‘शेतकरी कर्जमुक्ती’चा नारा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे सोमवारी अकोल्यात ‘शेतकरी कर्जमुक्ती’चा नारा गुंजला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीच्या मागणीकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष्य वेधले.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोला दौऱ्यावर आले होते. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून, त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकरी आणि शिवसैनिकांसोबत चर्चा केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईकडे प्रयाण करण्यासाठी शासकीय विश्रामगृहातून निघत असताना, शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी ‘शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देत, उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. शेतकरी आणि शिवसैनिकांच्या घोषणांनी शासकीय विश्रामगृह परिसर दणाणला होता. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अकोला दौऱ्यात ‘शेतकरी कर्जमुक्ती’चा नारा चांगलाच गुंजल्याचे चित्र दिसत होते.
सांगलीच्या शेतकऱ्याला दिलासा!
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख शासनाकडे व्यक्त करून कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी सांगलीचे शेतकरी विजय जाधव योगायोगाने सोमवारी अकोल्यात दाखल झाले. स्थानिक विश्रामगृहासमोर उभे असणाऱ्या विजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता शिवसेना प्रमुखांनी जाधव यांची आपुलकीने विचारपूस करण्यासोबतच प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व पेट्रोलची व्यवस्था करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले.
सांगलीचे शेतकरी विजय जाधव यांच्या गावात विलास शितापे नामक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. शितापे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांची फरपट होत असल्याचे पाहून जाधव यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, यासाठी ६ मेपासून कोल्हापूर ते नागपूर अशी कलश यात्रा सुरू केली. सांगली परिसरात २४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. अशा सर्व शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन विजय जाधव यांनी १४ मे रोजी नागपूर गाठले. नागपूर येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेट नाकारल्यानंतर जाधव आपल्या सहकाऱ्यांसोबत अकोल्यात दाखल झाले. योगायोगाने शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शहरात आगमन झाल्याची माहिती जाधव यांना मिळाली. उद्धव ठाकरे वेळ देतील का, याबाबत विजय जाधव यांना शंका होती. स्थानिक विश्रामगृहाबाहेर मुख्य रस्त्यावर ठाकरे यांची प्रतीक्षा करणाऱ्या जाधव यांची शिवसैनिक प्रदीप गुरुखुद्दे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणली. यावेळी पक्ष प्रमुख ठाकरे यांनी शेतकरी विजय जाधव यांची आपुलकीने चौकशी करत त्यांचे म्हणणे ऐकू न घेतले. शिवाय उपस्थित शिवसैनिकांना विजय जाधव आणि त्यांच्या सहकारी शेतकरी यांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था करण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे मोठा दिलासा मिळाल्याची भावना विजय जाधव यांनी व्यक्त केली.