दोन आरोपींना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
By Admin | Updated: July 18, 2014 00:45 IST2014-07-18T00:30:36+5:302014-07-18T00:45:50+5:30
अकोला शहरातील वाशिम बायपास पोलिस चौकीवर कार्यरत पोलिस कर्मचार्यास मारहाण करणे भोवले.

दोन आरोपींना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
अकोला - जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाशिम बायपास येथील पोलिस चौकीवर कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्यास मारहाण करणार्या दोन आरोपींना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. सी. बावस्कर यांच्या न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन्ही आरोपींना एक-एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास आणखी एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जुने शहर पोलस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले प्रवीण भाऊराव सोनोने हे वाशिम बायपास येथील पोलिस चौकीवर कार्यरत असताना २५ जुलै २0११ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या चौकीत सिद्धार्थ प्रभाकर तायडे व प्रशांत प्रल्हाद कांबळे या दोघांनी धुडगूस घातला होता. यावेळी प्रवीण सोनोने यांनी त्यांना विरोध केला असता दोन्ही आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच दुचाकीची तोडफोड करून पोलिस खात्याची वाकीटॉकी तोडून टाकली होती. सोनोने यांना मारहाण सुरू असतांनाच त्यांचे सहकारी लायक खान यांनी घटनास्थळावर येऊन आरोपींच्या तावडीतून प्रवीण सोनोने यांची सुटका केली. त्यानंतर सोनोने यांनी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत कांबळे व सिद्धार्थ तायडे या दोघांविरुद्ध कलम ३३३, ३५३, ५0४, ४२७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. न्यायालयामध्ये खटला सुरू असताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.सी. बावस्कर यांच्या न्यायालयाने या प्रकरणामध्ये सात साक्षीदार तपासले. त्यानंतर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी प्रशांत कांबळे व सिद्धार्थ तायडे या दोघांना कलम ३३३ मध्ये दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोबतच एक हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे अँड. पी. पी. नागरे, यांनी तर आरोपीतर्फे अँड. नौरंगाबादी यांनी कामकाज पाहिले.