अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील दोन्ही आगारात दररोज अघोषित दुचाकी पार्किंगचा विळखा टाकला जात आहे. या प्रकारामुळे बसस्थानकातील फलाटावर येणाºया एसटी चालक-वाहकांना त्रास सहन करावा लागत असला तरी वरिष्ठ अधिकारी आणि डेपो व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष आहे.अकोला शहरातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्यांची आगार क्रमांक एकवर आणि अकोल्यातून संपूर्ण राज्यात प्रवास करणाºयांची आगार क्रमांक दोनवर कायम गर्दी असते. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करीत असतात. त्यामुळे दोन्ही बसस्थानकांवर गर्दी असते. कुणी आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी तर स्वत: आपले दुचाकी वाहन घेऊन बसस्थानकावर येत असतात. त्यामुळे पार्किंग झोनसोबतच परिसराला अघोषित पार्किंगचे रूप आलेले असते. अनेकजण बसस्थानकाच्या आतील भागातदेखील गाड्या ठेवण्याची हिंमत करतात. बस उभी राहत असलेल्या फलाटावर गाड्या पार्किंग केल्या जात असल्याने एसटी चालक-वाहक त्रासले आहेत. एसटी चालक-वाहकांना बसगाड्या उभ्या करण्यासाठी दुचाकी वाहने काढावी लागतात. या प्रकाराकडे म.रा. परिवहन अकोला विभागातील अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. अघोषित दुचाकी पार्किंगचा दोन्ही बसस्थानकांवरील विळखा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.