ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: April 9, 2017 01:36 IST2017-04-09T01:36:40+5:302017-04-09T01:36:40+5:30
तीन अपघातात एक ठार पाच जखमी.

ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार
अकोला : शहरातील दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी विविध ठिकाणांवर झालेल्या तीन रस्ते अपघातात एकजण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली, तर अन्य दोन अपघातांमध्ये पोलीस कर्मचार्यासह त्यांचे वडील आणि दोन वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसर्या अपघातात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने श्रद्धा रेसिडन्सी येथील दोघे जण जखमी झाले आहेत. शहरात घडलेल्या तीन अपघातांत एक ठार झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.
चांदूर येथील रहिवासी एक २९ वर्षीय युवक दुचाकीने अकोल्यात येत असताना ट्रकखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चांदूर येथील रहिवासी समाधान ऊर्फ सोमेश्वर वासुदेव पद्मने (२९) हा युवक एमएच ३0 एवाय 0३८0 क्रमांकाच्या दुचाकीने बाजार करण्यासाठी अकोल्याकडे येत असताना त्याचा दुचाकीवरील तोल गेला. त्यामुळे रोडवर कोसळताच तो रेतीने भरून जात असलेल्या एम एच 0४ ४८0३ क्रमांकाच्या भरधाव ट्रकखाली आला. यामध्ये समाधान पद्मने याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, सदरचा ट्रक खदान पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला आहे.