चार वाहनांचा विचित्र अपघातात दोन ठार
By Admin | Updated: June 24, 2016 23:38 IST2016-06-24T23:38:50+5:302016-06-24T23:38:50+5:30
वाशिम-अकोला महामार्गावरील घटना.

चार वाहनांचा विचित्र अपघातात दोन ठार
मालेगाव/अमानी (जि. वाशिम): दुचाकीला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटल्याने एक ट्रक विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकी व मालवाहू वाहनावर आदळला. या विचित्र अपघातात दुचाकीस्वार व मालवाहू वाहनातील एक जण असे दोघे ठार झाले, तर चार जण जखमी झाले. ही घटना वाशिम ते मालेगाव मार्गावर झोडगा फाट्यानजीक शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार विवेक कचोलिया (३७ रा. डोंगरकिन्ही, मालेगाव) व मालवाहू वाहनातील विजय भुजंगराव तारू (रा. नांदेड) असे मृतकांचे नाव आहे. मालेगावकडे येत असलेल्या भरधाव ट्रक (एचआर ४६ सी ५0९७) ने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला ( एमएच ३७, बी 00६४) धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक विवेक कचोलिया हे जागीच ठार झाले. या अपघातात अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोरून येत असलेल्या मालवाहू वाहन (एमएच २६ एडी १८८८) व अन्य एका ऑटोरिक्षा (एमएच ३७ बी ३६४३) लाही जबर धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहनातील विजय भुजंगराव तारू हे जागीच ठार झाले, तर नवाब खान हे जखमी झाले. अपघातग्रस्त ऑटोरिक्षामधील तीन जण जखमी झाले. या अपघातामुळे मालेगाव-वाशिम महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.