दोन शिक्षकांचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: April 9, 2015 01:33 IST2015-04-09T01:33:59+5:302015-04-09T01:33:59+5:30
नवोदय विद्यालय लैंगिक छळ प्रकरण, परीक्षेत सहभागी होण्याची परवानगी नाकारली.

दोन शिक्षकांचा जामीन फेटाळला
अकोला - बाभूळगाव जहाँगीर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी अटकेत असलेले आरोपी शिक्षक शैलेश रामटेके आणि राजन गजभिये यांचा जामीन अर्ज बुधवारी ह्यपॉस्कोह्णच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयाने फेटाळला. दोन्ही शिक्षकांनी परीक्षेत सहभागी होण्याची परवानगी न्यायालयाला मागितली होती. मात्र न्यायालयाने शिक्षकांना जामीन नाकारला. जवाहर नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी राजन गजभिये आणि शैलेश रामटेके या दोन शिक्षकांविरुद्ध पॉस्को अँक्टच्या कलम ७ आणि ८ सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच संदीप लाडखेडकर व गजभिये याचा विद्यार्थी मुंगणकर यालाही सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली असून सद्यस्थितीत हे चारही आरोपी १0 एप्रिलपर्यंंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान या प्रकरणी आरोपी शिक्षकांच्या वकिलांनी शैलेश रामटेके आणि राजन गजभिये यांना एका परीक्षेमध्ये सहभागी व्हायचे असल्याने त्यांना जामीन देण्यात यावा, यासाठी पॉस्कोच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज सादर केला. या अर्जावर पॉस्कोच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली असून, त्यांनी दोन्ही शिक्षकांचा जामीन अर्ज फेटाळला. यासोबतच कुठल्याही परीक्षेत या शिक्षकांना सहभाग घेता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. जिल्हा सरकारी वकील अँड. विनोद फाटे यांनी या जामीन अर्जाला विरोध करीत दोन्ही शिक्षकांना कुठल्याही परिस्थितीत परीक्षेसाठी किंवा इतर कारणासाठी सवलत देण्यास विरोध केला. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनीही जामिनासाठी युक्तिवाद केला. मात्र, दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांनी आरोपी शिक्षकांचा जामीन अर्ज फेटाळला.