रेल्वेचे दोन पोलिस गजाआड
By Admin | Updated: July 31, 2014 02:09 IST2014-07-31T02:02:28+5:302014-07-31T02:09:22+5:30
आरोपीकडून २0 हजारांची लाच घेतल्याचे प्रकरण.

रेल्वेचे दोन पोलिस गजाआड
अकोला: रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्याच्या एटीएममधून २0 हजार काढून समाधान न झालेल्या दोन पोलिस हेड कॉन्स्टेबलांनी आणखी १0 हजारांची मागणी केली. या लाचखोर दोन्ही पोलिस कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली.
सोनसाखळी चोरीचा आरोप असलेला मलकापूर येथील महेश करोडदे यास जीआरपी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. महेश रेल्वे पोलिसांच्या कोठडीत असताना एएसआय शेख अन्वर शेख अली आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल मनोहर गवई, इरफान अजीज खान पठाण यांनी त्याच्याकडील एटीएम कार्ड काढून घेतले आणि त्याला कोठडीत मारहाण न करणे, वृत्तपत्रांना माहिती न देणे आणि सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्याला सुरुवातीला २0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. करोडदे याने मागणी मान्य करताच या लाचखोरांनी त्याच्या एटीएमचा कोड नंबर माहिती करून घेत त्याच्या एटीएममधून २0 हजार रुपयांची रोख काढली. त्यानंतरही लाचखोरांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा करोडदे याला १0 हजार रुपयांची मागणी केली; परंतु खात्यात पैसे नसल्याने करोडदे याने त्याच्या मालकाला खात्यात १0 हजार रुपये टाकण्यास सांगितले होते. मालकाने खात्यात १0 हजार रुपये जमा केले. त्यानंतर एएसआय शेख अन्वर याने करोडदे याला पुन्हा ५00 रुपयांची लाच मागितली. दरम्यान, करोडदे याच्या मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने एसीबीने रेल्वे पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा रचून लाच घेताना एएसआय शेख अन्वर याला गजाआड केले. मात्र पोलिस हेड कॉन्स्टेबल कपिल गवई, इरफान पठाण हे दोघे फरार झाले. एसीबीने या दोघाही लाचखोरांना बुधवारी गजाआड केले. गुरुवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले जाईल.