छेडखानीच्या वादातून जाळल्या दोन मोटारसायकली
By Admin | Updated: December 23, 2014 00:40 IST2014-12-23T00:40:42+5:302014-12-23T00:40:42+5:30
अकोल्यातील न्यू तापडीया नगर पोलिस चौकीसमोरच घडली घटना.

छेडखानीच्या वादातून जाळल्या दोन मोटारसायकली
अकोला: छेडखानीच्या वादातून अज्ञात युवकांनी दोन युवकांच्या मोटारसायकली जाळल्याची घटना सोमवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास न्यू तापडियानगरातील पंचशीलनगरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख अनिस शेख अयुब (२८) आणि शेख रहिम शेख रहेमान हे दोघे परिसरातील एका मुलीची छेड काढीत असल्याची बाब पंचशीलनगरातील तीन ते चार युवकांना समजली. या युवकांनी न्यू तापडियानगरातील पोलीस चौकीजवळ या दोघांनाही पकडले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर परिसरातील ८ ते १0 युवक या ठिकाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दोघा युवकांनी त्यांच्या दोन्ही मोटारसायकली घटनास्थळावरच सोडून तेथून पळ काढला. दरम्यान संतप्त युवकांनी पोलीस चौकीसमोरच या दोघांच्याही मोटारसायकली पेटवून दिल्या.
सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे ठाणेदार पी.डी. ढाकणे हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. तोपर्यंत मोटारसायकली जाळणारे युवक घटनास्थळावरुन पसार झाले होते.