ट्रक-कार अपघातात दोन ठार, एक गंभीर
By Admin | Updated: September 26, 2014 23:44 IST2014-09-26T23:44:49+5:302014-09-26T23:44:49+5:30
धोत्रा जहाँगीरनजिकची घटना.

ट्रक-कार अपघातात दोन ठार, एक गंभीर
कामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या धोत्रा जहाँगीर जवळ ट्रक व कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री १0.३0 च्या सुमारास घडली. जखमीला अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अमरावती येथील व्यापारी सुशील कैलाशचंद हेडा ( २१) आणि त्यांचे मित्र गोविंद तवानी (३२) हे दोघे गुरुवार २५ सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास एमएच ३७ एच-३७३0 क्रमांकाच्या कारने मंगरूळपीरवरून वसूली करून अमरावतीकडे येत होते. त्याचवेळी विरूद्ध दिशेने एमएच ३२ बी-९७१५ क्रमांकाचा खाली सिलिंडरने भरलेला ट्रक येत होता. या ट्रकने गाडीला ड्रायव्हरच्या बाजुने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की ड्रायव्हरची बाजू पुर्णत: तुटून गाडीचे तुकडे रस्त्यावर पडले, तर गाडी फरफटत जावून झाडाला धडकली. यामध्ये सुशील हेडा रा. अमरावती व चालक हरिष माहुरकर (३७) रा. अमरावती यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोविंद तवानी (३४) रा.अमरावती हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमरावती हलविण्यात आले आहे.