वीज कोसळून दोन ठार; आसेगाव व पांगरीत शोककळा
By Admin | Updated: April 11, 2015 01:46 IST2015-04-11T01:46:14+5:302015-04-11T01:46:14+5:30
रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला.

वीज कोसळून दोन ठार; आसेगाव व पांगरीत शोककळा
वाशिम/मालेगाव : जिल्ह्यात १0 एप्रिल रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यादरम्यान मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे व रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील दोन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तालुक्यातील पांगरी नवघरे येथील १७ वर्षीय विठ्ठल माधव तागड हा अकराव्या वर्गात शिकणारा युवक शेतात बकर्या चारत असताना विज अंगावर कोसळल्याने जागीच ठार झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. इतर दोघे जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. पांगरी नवघरेच्या उत्तरेकडे असलेल्या धरणाच्या बाजूच्या शेतामध्ये विठ्ठल तागड, विष्णू नवघरे आणि वामन तुकाराम नवघरे हे बकर्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडे ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. त्यामध्ये वीज अंगावर कोसळल्याने विठ्ठल तागड हा जागीच ठार झाला, तर विष्णू नवघरे (४0)े गंभीर जखमी झाले. वामन नवघरे (४५) हे किरकोळ जखमी झाले. जखमी विष्णू नवघरे यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले, तर वामन नवघरे यांच्यावर मालेगाव येथील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेमध्ये त्यांच्याकडील चार बकर्यासुद्धा ठार झाल्या आहेत. पुढील तपास ठाणेदार तट याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. अन्य एका घटनेत रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १६ वर्षीय रामा लोणकर या अकराव्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांवर वीज कोसळली. त्यामध्ये तो ठार झाल्याची घटना १0 एप्रिलला ५.३0 वाजता घडली. गावानजीक असलेल्या शेतातून तो घरी परत येत होता. वाटेतच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याने गावाकडे येण्यास सुरुवात करतानाच त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्याचा तेथेच मृत्यू झाला.