रामगावात दोन हरणांची शिकार
By Admin | Updated: August 31, 2014 01:32 IST2014-08-31T01:32:06+5:302014-08-31T01:32:38+5:30
अकोला तालुक्यातील रामगाव-गोंडापूर शिवारात दोन हरणांची शिकार.

रामगावात दोन हरणांची शिकार
अकोला: तालुक्यातील रामगाव-गोंडापूर शिवारात दोन हरणांची शिकार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या हरणांची शिकार वन्यप्राण्याने केली असल्यामुळे परिसरात बिबट असल्याची भीती गावकर्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाच्या अधिकार्यांनी मात्र परिसरात बिबटच्या वास्तव्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
रामगाव-गोंडापूर शिवारात शनिवारी सकाळी दोन हरण मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर गावात हरणांची शिकार झाल्याची माहिती पसरताच नागरिकांनी मृत हरण पाहण्याकरिता गर्दी केली. हरणांची वन्यप्राण्यांनीच शिकार केली असल्याचे गावकर्यांच्या लक्षात आले. हरणांच्या शरीरावरील काही भागावरील मांस खाण्यात आले आहे. त्यामुळे गावात बिबट्या आल्याची भीती गावकर्यांमध्ये व्यक्त होत आहे; मात्र ही शिकार तडशाने केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर वन्यप्राण्याचे ठसे होते की नाही, याची माहिती गावकर्यांनी घेतली नाही. या प्रकरणाची माहिती वन विभागाला दिली आहे. तसेच गावात येऊन शिकार कुणी केली, याची चौकशी करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.
रामगाव शिवारात दोन हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही शिकार तडशाने केली असावी, असा अंदाज आहे. या भागात बिबट्याचा वावरच नाही. त्यामुळे ही शिकार बिबट्याने केलीच नसून, तडशाने केली असावी. घटनास्थळावर पाहणी केल्यानंतर निश्चित माहिती मिळेल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण यांनी सांगीतले.