तेल्हारा पोलीस स्टेशनसमोर दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: January 8, 2015 00:43 IST2015-01-08T00:43:34+5:302015-01-08T00:43:34+5:30
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

तेल्हारा पोलीस स्टेशनसमोर दोन गटात हाणामारी
तेल्हारा : तेल्हारा पोलीस स्टेशनसमोरच बुधवार, ७ जानेवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने काहीकाळ तेल्हारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरात आकोट, हिवरखेड, दहीहांडा पोलीस ताफ्यासह आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
येथील सेठ बन्सीधर विद्यालयातील एका विद्यार्थ्याला शाळेच्या परिसरात जाऊन मारहाण केल्याने वाद विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही गट पोस्ट ऑफिससमोर येऊन त्यांच्यामध्ये किरकोळ स्वरूपाची हाणामारी झाली. यानंतर काही युवकांनी पोलीस स्टेशनसमोर हाणामारी केली. हा प्रकार लक्षात येताच ठाणेदार शे. अन्वर यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व जमाव पांगविला. न. प. कार्यालयासमोर लोकांची गर्दी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दोन गटातील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून तेल्हारा ठाणेदारांनी आकोट, दहीहांडा, हिवरखेड येथील पोलीस कुमक बोलावून घेतली. दरम्यान आकोटचे पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी कुठल्याही गुन्हा दाखल नव्हता.