पॅथालॉजिस्टला खंडणी मागणारे दोघे गजाआड
By Admin | Updated: March 6, 2015 01:52 IST2015-03-06T01:52:11+5:302015-03-06T01:52:11+5:30
पोलिसांत तक्रार न करण्यासाठी मागितली साडेतीन लाखांची खंडणी.
_ns.jpg)
पॅथालॉजिस्टला खंडणी मागणारे दोघे गजाआड
अकोला : पॅथालॉजिस्टने दिलेल्या रक्त तपासणी अहवालावर नाव, सही, नोंदणी क्रमांक नसल्याबाबत पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांना साडेतीन लाख रुपयांची खंडणी मागणारे चंद्रकांत झटाले व अश्विन नवले यांच्याविरुद्ध गुरुवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. गजाआड केलेल्या या दोघा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल. सुधीर कॉलनीमध्ये राहणारे अविनाश नामदेवराव उंबरकर(२९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शास्त्रीनगरातील मालवीय इस्पितळात त्यांची पॅथालॉजी लेबॉरेटरी आहे. आरोपी चंद्रकांत बापूराव झटाले (३२ रा. दत्त कॉलनी) हा २ मार्च रोजी डॉ. आशिष लाहोळे यांच्या सांगण्यावरून उंबरकर यांच्या लेबॉरेटरीमध्ये गेला. तेथे त्याने रक्त तपासणी करून घेतली. ३ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तो रक्त तपासणीचा अहवाल घेण्यासाठी लेबॉरेटरीमध्ये गेला. त्याला मिळालेल्या अहवालावर पॅथालॉजिस्टचे नाव, सही, नोंदणी क्रमांक नव्हता. याबाबत झटाले यांनी अविनाश उंबरकर यांच्यासोबत हुज्जत घातली. तुम्ही बोगस पॅथालॉजिस्ट आहात, तुमची पोलिसांत तक्रार देतो, अशी धमकी देऊन त्याने सहकार्यांनाही लेबॉरेटरीमध्ये बोलावून घेतले. डॉ. मालवीय व उंबरकर यांच्यासोबत वाद घातल्यानंतर सर्व जण तेथून निघून गेले. गुरुवारी दुपारी चंद्रकांत व अश्विन नवले यांनी उंबरकर यांना फोन करून पोलिसांत तक्रार करीत असल्याची माहिती दिली. पोलिसांत तक्रार होऊ द्यायची नसेल, तर साडेतीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी व दमदाटी केली. त्यामुळे अविनाश उंबरकर यांनी या दोघांविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३८४ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.