कट्यार येथील दोन शेतक-यांचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: December 10, 2014 01:58 IST2014-12-10T01:58:03+5:302014-12-10T01:58:03+5:30
एकाची प्रकृती गंभीर, दुस-याची धोक्याबाहेर.

कट्यार येथील दोन शेतक-यांचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोला - कर्जबाजारीपणा आणि यावर्षीच्या दुष्काळामुळे झालेल्या नापिकीला कंटाळून अकोला तालुक्यातील कट्यार येथील एका युवा शेतकर्याने रविवारी, तर दुसर्या शेतकर्याने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोन्ही शेतकर्यांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, एकाची प्रकृती स्थिर असून, दुसरा शेतकरी मात्र मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकाराने कट्यार परिसर हादरा आहे.
कट्यार येथील रहिवासी गणेश शालीग्राम दंदी (४८) यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३0 हजार रुपयांचे कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. सोयाबीन आणि मूग पेरल्यानंतर थोड्या प्रमाणात पाऊस आला. चांगले पीक होण्याची अपेक्षा होती, मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने मूग होता त्याच अवस्थेत करपला. दीड एकरामध्ये ७0 ते ८0 किलो सोयबीन झाले आणि हरभरा पेरला तरी उगवण्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे बँकेचे आणि एका खासगी व्यक्तीकडून घेतलेले कर्ज फेडणे तसेच संसाराचा गाडा पुढील एका वर्षे चालविणे अशक्य वाटल्याने गणेश दंदी यांनी राहत्या घरात मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार त्यांची पत्नी शोभा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. महिलेचा आवाज ऐकताच घराच्या आजूबाजूची मंडळी मदतीसाठी धावल्याने गणेश दंदी यांचे प्राण वाचले; मात्र त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याच गावातील युवा शेतकरी दीपक राजू साबे याचे एप्रिल महिन्यात लग्न झाले. लग्नासाठी काही प्रमाणात कर्ज घेतले, तर त्यानंतर पेरणीसाठी कर्ज घेतले. येणार्या हंगामात संपूर्ण कर्ज फेडण्याच्या जिद्दीने या शेतकर्याने शेतात काम सुरू केले; मात्र पावसाने दडी मारल्याने दुष्काळ पडला आणि जिद्दीने कामाला लागलेल्या या शेतकर्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.