दोन देशी बनावटीच्या पिस्तूल, ६ काडतूस जप्त
By Admin | Updated: October 1, 2014 23:23 IST2014-10-01T23:23:06+5:302014-10-01T23:23:06+5:30
अकोला येथे दोन आरोपी गजाआड; टोळी असण्याची शक्यता.

दोन देशी बनावटीच्या पिस्तूल, ६ काडतूस जप्त
अकोला: जिल्हय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात परप्रांतातून देशी कट्टे, पिस्तूल, काडतूस आणि तलवारींची तस्करी होत आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चिवचिव बाजार परिसरातील घरात छापा घालून दोन देशी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महिनाभरा तच पोलिसांनी पाच देशी बनावटीचे पिस्तूल व ९ जिवंत काडतूस जप्त केले, हे विशेष.
महिनाभरातील पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्वर फड व त्यांच्या पथकातील मनोहर मोहोड, शेख हसन, अजय नागरे यांना सोमवारी चिवचिव बाजारातील घरामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिवचिव बाजारातील घरामध्ये झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी राहुल सुधाकर इंगळे (२५) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले. चौकशीदरम्यान राहुल इंगळे याने मलकापूर येथे राहणारा आनंद नंदकुमार देशमुख (२५) यालासुद्धा एक पिस्तूल २३ हजार रुपयांमध्ये विकल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी आनंद देशमुख याच्या घरी छापा मारून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडूनही पिस् तूल जप्त केली. गुरुवारी दोघाही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईमूळे पिस्तूल तस्करीमागे टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढू शकते.
** राहुल हा हत्याकांडातील आरोपी
काही वर्षांपूर्वी राधाकिसन प्लॉटमध्ये झालेल्या हत्याकांडामध्ये आरोपी राहुल इंगळे याचा समावेश होता, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांची टोळीसुद्धा चालवतो. राहुल हा कुख्यात असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
**पोलिस अधीक्षकांकडे करायचा तक्रारी
राहुल इंगळे हा कुख्यात गुंड असल्यामुळे पोलिसांचा सातत्याने त्याच्यामागे ससेमिरा लागायचा. पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी राहुल हा थेट तत्कालिन पोलिस अधीक्षकांना फोन करायचा आणि पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या तक्रारी करायचा. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास धजावत नसत.