बिबट्याच्या हल्ल्यात दोन गुरे ठार
By Admin | Updated: May 29, 2017 01:34 IST2017-05-29T01:34:18+5:302017-05-29T01:34:18+5:30
पास्टुल शिवारातील घटना : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याच्या हल्ल्यात दोन गुरे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी: (अकोला) पातूर तालुक्यातील पास्टुल या मोर्णा धरणाला लागून असलेल्या गावालगत २७ मे रोजी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संतोष प्रल्हाद आडोळकर व रामजी कुंडलीक केंद्रे यांचे प्रत्येकी एक असे दोन गुरे ठार झाली.
गावाला लागून असलेल्या शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला झालेल्या ठिकाणापासून गावातील घरे दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर आहेत, हे विशेष! पास्टुल, आस्टुल, खानापूर, कोठारी या परिसरामध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेची माहिती संबंधितांनी पातूर वन विभागाला दिली असता घटनास्थळी पथकाने भेट देऊन मृत जनावरांचा पंचनामा केला. पथकामध्ये पातूर येथील विशेष सेवा वनपाल डी. व्ही. सानप, वनरक्षक वाय. पी. सरकटे, एम. डी. वाणी, एस. पी. रंजवे, वन कामगार एम. एल. खोसे यांचा समावेश होता. याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
बिबट्याने ठार केलेल्या गुरांच्या ठिकाणापासून माझे घर दहा ते पंधरा फुटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण तयार झाले.
- विनोद तायडे, ग्रामस्थ, पास्टुल
संतोष आडोळकर व रामजी केंद्र यांच्या दोन गुरांवर वाघाने हल्ला केला असून, सदर गुरांच्या मृतदेहाचा पंचनामा करून वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली.
- डी. व्ही. सानप, वनपाल, पातूर