दोन लाचखोर पोलिसांना अटक
By Admin | Updated: May 31, 2017 01:56 IST2017-05-31T01:56:08+5:302017-05-31T01:56:08+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

दोन लाचखोर पोलिसांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई न करण्यासाठी बोरगाव मंजू येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी १,५00 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार तो बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता. आता त्याने दारूचा व्यवसाय बंद केला. त्यानंतरही बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पांडुरंग इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल हरीश शालिग्राम सातव हे तक्रारदाराला त्याच्यावर फौजदारी कारवाई न करण्यासाठी १,५00 रुपयांची मागणी करीत होते. त्यामुळे तक्रारदाराने २२ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी मनोहर इंगळे व हरीश सातव यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला; परंतु लाचखोर पोलीस कर्मचारी मनोहर इंगळे व हरीश सातव यांना संशय आल्याने, त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही; परंतु त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कलम ७, १५ नुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
दोघाही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला.
लाचखोरांविरुद्ध नागरिकांनी पुढे यावे
नागरिकांना अनेकदा शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्या जाते किंवा लाच स्वीकारली जाते. लाच देणे व घेणे दोन्ही गुन्हा आहे; परंतु सातत्याने लाच घेण्याचे गुन्हे घडतात.
देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी नागरिकांनी लाचखोरांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी किंवा १0६४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांनी स्पष्ट केले.