तुषार पुंडकर हत्याकांड; ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:18 IST2021-01-28T17:18:01+5:302021-01-28T17:18:19+5:30
Tushar Pundkar murder सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुषार पुंडकर हत्याकांड; ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
अकाेला : आकाेट येथील रहिवासी तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांड प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकम यांच्याकडे हे प्रकरण साेपविल्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. प्रहारचे नेते तुषार पुंडकर हे २१ फेब्रुवारी २०२० राेजी रात्री माेबाइलवर बाेलत घराकडे जात असतांना त्यांच्यावर गाेळ्या झाडून अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली हाेती. या प्रकरणी आकाेट शहर पाेलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला हाेता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व आकाेटचे ठाणेदार संताेष महल्ले यांच्या पथकाने या हत्याकांड प्रकरणातील आराेपींचा पर्दाफाश करीत पवन नंदकिशाेर सेदानी, अल्पेश भगवान दुधे, शाम उर्फ स्वप्नील पुरुषाेत्तम नाठे, गुंजन देवीदास चिंचाेले, निखील कृष्णकांत सेदानी, शुभम हमीचंद जाट आणि शाहबाज इस्माइल खान या सात आराेपींना अटक केली हाेती. त्यानंतर हे आराेपी कारागृहात असतांनाच हे प्रकरण विशेष सरकारी विधिज्ञ ॲड उज्ज्वल निकम यांच्याकडे साेपविण्यात यावे, अशी मागणी राज्यमंत्री तथा अकाेला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासनाकडे केली हाेती. त्यानुसार शासनाने विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची तुषार पुंडकर हत्याकांड प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली आहे.