तूर, हरभऱ्याचे दर २०० रुपयांनी गडगडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:52+5:302021-04-21T04:18:52+5:30
खरीप व रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, किडींमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर, हरभऱ्याचे उत्पादन घटले. सुरुवातीला कमी ...

तूर, हरभऱ्याचे दर २०० रुपयांनी गडगडले !
खरीप व रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, किडींमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर, हरभऱ्याचे उत्पादन घटले. सुरुवातीला कमी दराने मालाची खरेदी झाली; परंतु सलग दोन महिन्यांपासून तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. जिल्ह्यांतील बाजार समितीत तुरीचा भाव ७ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हरभऱ्याचा दर ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल झाला होता. बाजार समितीत दर वाढल्याने जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रे ओस पडली. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनला तुरीचा एक दाणाही खरेदी करता आला नाही. सर्व तूर बाजार समिती विकल्या गेली. हरभऱ्याचीदेखील हीच स्थिती आहे. सुरुवातीच्या काळात हमीभावापेक्षा दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी हरभरा मार्केटिंग फेडरेशनला दिला; मात्र आता दर वाढल्याने बाजार समितीत हरभरा विकल्या जात आहे. तूर व हरभऱ्याच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता असताना मंगळवारी २०० रुपयांनी दरात घसरण पहावयास मिळाली. मागील दोन दिवसांपासून बाजार समितीत आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
--बॉक्स--
सोयाबीनला सोन्याचे दिवस
शहरातील बाजार समितीत सोयाबीनला सोन्याचे दिवस आले आहे. मंगळवारी सोयाबीनचे दर ७ हजार ३००पर्यंत पोहोचले आहे. त्या सोबत आवकही सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले असल्याने त्यांना दरवाढीचा फायदा होणार नाही.
--बॉक्स--
मंगळवारी तुरीचे दर
७,१७५
मंगळवारी हरभऱ्याचे दर
५,३५०