नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम गुंडाळली

By Admin | Updated: October 14, 2014 01:35 IST2014-10-14T01:35:09+5:302014-10-14T01:35:09+5:30

अकोला मनपा; थकीत देयकापोटी कंत्राटदाराचे हात वर

Tubal disconnection campaign rolled out | नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम गुंडाळली

नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम गुंडाळली

अकोला : महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने अवैध नळ जोडणी तोडण्याची मोहीम गुंडाळल्याचे समोर आले आहे. नळ जोडणी तोडणार्‍या कंत्राटदाराचे देयक प्रशासनाने अदा न केल्यामुळे कंत्राटदाराने हात वर केल्याची माहिती आहे. परिणामी अवैध नळ जोडणीचा शोध घेऊन केवळ पाणीपट्टी वसुलीचे काम संबंधित अधिकारी करीत आहेत. शहरात अवैध नळ कनेक्शनधारकांची संख्या ४0 हजारांपेक्षा जास्त असून, ३२ हजार वैध नळ कनेक्शनधारकांकडे कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याची वस्तुस्थिती आहे. मोठा गाजावाजा करीत मनपा प्रशासनाने अवैध नळ जोडणी वैध करून घेण्याची मोहीम सुरू केली. सुरुवातीला शहरातील डॉक्टर, उद्योजक, व्यावसायिकांची नळ जोडणी तोडण्यासोबतच फौजदारी तक्रारीही नोंदवण्यात आल्या. प्रशासनाच्या ठोस भूमिकेमुळे नागरिकांनी मनपात धाव घेऊन नळ जोडण्या वैध केल्या. अवैध नळ जोडणी खोदून ते तोडण्याचा मनपाने कंत्राट दिला होता. शेख फिरोज नामक कंत्राटदाराला प्रतिकनेक्शन २00 रुपयेप्रमाणे पैसे अदा करण्याचा कंत्राट होता. संबंधित कंत्राटदाराने सुमारे ४00 नळ जोडण्या तोडल्या. त्याचे ६0 हजार रुपये देयक प्रशासनाने अदा करणे भाग होते; परंतु देयक अदा न केल्याने कंत्राटदाराने नळ जोडणी तोडण्याचे काम बंद केले. यामुळे नळ जोडणीधारकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून केवळ दंडात्मक रकमेच्या वसुलीचे काम जलप्रदाय विभागाकडून केले जात आहे. यामुळे वसुलीत मोठी घसरण आली असून, प्रशासनाच्या धोरणात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: Tubal disconnection campaign rolled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.