सोनारास लुटण्याचा प्रयत्न; छर्याच्या बंदुकीने केले जखमी
By Admin | Updated: August 13, 2014 23:44 IST2014-08-13T23:22:01+5:302014-08-13T23:44:52+5:30
अकोला जिल्ह्यातील लोहगड येथील घटना.

सोनारास लुटण्याचा प्रयत्न; छर्याच्या बंदुकीने केले जखमी
लोहगड: व्यवसायानिमित्त मालेगाव तालुक्यातील आठवडी बाजारात जात असलेल्या येथील एका सोनारास अज्ञात चोरट्यांनी बुधवार, १३ ऑगस्ट रोजी छर्याच्या बंदुकीच्या फैरी झाडून लुटण्याचा प्रयत्न केला; परंतु, सदर सोनाराने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. संतोष वाटाने हे गत दहा वर्षांपासून धाबा येथे स्थायिक झाले असून, या गावात त्यांचे सोने-चांदीच्या आभूषणांचे दुकान आहे. व्यवसायानिमित्त ते परिसरातील आठवडी बाजारांमध्ये जात असतात. याच नित्यनियमाप्रमाणे ते बुधवारी सकाळी वाशिम जिल्हय़ातील मालेगाव तालुक्यातील अमानवाडी येथील आठवडी बाजारात दुचाकीने जात होते. साखरविरा, माळेगाव ते अमानवाडीदरम्यान असलेल्या घनदाट जंगलातून जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर बंदुकीतून छर्याच्या फैरी झाडल्या. त्यापैकी एक छर्रा त्यांच्या दंडाला चाटून गेला. यामुळे ते जखमी झाले. रक्तबंबाळ झालेल्या हाताची परवा न करता त्यांनी तेथून दुचाकी दामटली व ते अमानवाडीला पोहचले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अकोला येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर जऊळका रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली; परंतु त्यांना चोरट्यांचा माग काढता आला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.