कामाच्या व्यस्ततेत मिळेल तेवढा वेळ कुटुंबीयांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:42+5:302021-05-15T04:17:42+5:30
अकोला : जिल्हा परिषदेंतर्गत प्रशासकीय कामकाजासोबतच ग्रामीण भागातील अडचणींचे निवारण आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजाणी कामाच्या ...

कामाच्या व्यस्ततेत मिळेल तेवढा वेळ कुटुंबीयांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न !
अकोला : जिल्हा परिषदेंतर्गत प्रशासकीय कामकाजासोबतच ग्रामीण भागातील अडचणींचे निवारण आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजाणी कामाच्या व्यस्ततेत कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी वेळ अपुरा पडत असला, तरी कामाला प्राधान्य देऊन मिळेल तेवढा वेळ कुटुंबीयांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न असतो, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील मूळचे रहिवासी असलेले सौरभ कटियार गतवर्षी जुलैमध्ये अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. जिल्हा परिषदेंतर्गत दैनंदिन प्रशासकीय कामकाज, शासनाच्या विविध निर्णय, आदेश आणि निर्देशांची अंमलबजावणी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि विभागप्रमुख अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध योजना आणि विकासकामांची अंमलबजावणी व नियंत्रण ठेवण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावे लागते. यासोबतच कोरोना काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या आणि अडचणींचे निवारण करणे, जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणे, आढावा बैठका, कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आदी प्रकारची कामे करतानाच जनतेच्या भेटीसाठी वेळ द्यावा लागतो. कार्यालयातील काम आटोपल्यानंतर महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी, तातडीच्या कामांच्या फाइल्स निकाली काढणे आदी प्रकारची कामे रात्रीच्या वेळी घरीच हाताळाव्या लागत आहेत. कोरोना काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध समस्या आणि अडचणी निवारणासाठी रात्रीच्या वेळीदेखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्यानुषंगाने कामाच्या व्यस्ततेत कुटुंबीयांना पाहिजे तेवढा वेळ देणे शक्य होत नाही. मात्र, आवश्यक असलेली कामे पूर्ण केल्यानंतर मिळेल तेवढा वेळ कुटुंबीयांसोबत आनंदाने घालविण्याचा प्रयत्न सुरू असतो. कर्तव्य पूर्ण करून मिळालेला वेळ शेअर केल्याचे कुटुंबीयांनाही समाधान असते, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कोरोना काळात सौरभ कटियार कामात व्यस्त असतात. ग्रामीण भागातील अडचणी निवारणासंदर्भात त्यांचे रात्रंदिवस काम सुरू असते. वेगवेगळ्या समस्या, नवनवीन अडचणी निकाली काढण्याचे कर्तव्य पूर्ण करण्याच्या व्यस्ततेतूनही मिळालेला वेळ ते आमच्याशी आनंदाने शेअर करतात याचे आम्हाला समाधान आहे.
-डाॅ. माेनिका सौरभ कटियार (पत्नी)
आइ- वडिलांची भेट वर्षातून दोनदाच!
कोरोना काळात कामाची व्यस्तता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लखनऊ येथे राहणाऱ्या आई- वडिलांची गेल्या वर्षभरात दोनदाच भेट होऊ शकली. दोन- तीन दिवसांआड भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संवाद साधून विचारपूस करीत असतो, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.
....................फोटो...........................