ट्रकचालकाची निर्घृण हत्या, क्लीनरविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 23, 2015 02:44 IST2015-12-23T02:44:45+5:302015-12-23T02:44:45+5:30
किरकोळ वादातून निर्घृण हत्या; आरोपी क्लीनर फरार.

ट्रकचालकाची निर्घृण हत्या, क्लीनरविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला: किरकोळ वादातून क्लीनरने ट्रक चालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आरोपी क्लीनर फरार झाला असून, याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील राजरूपपूर येथे राहणारा ट्रकचालक विनोदकुमार त्रिभुवनसिंह(५0) आणि त्याचा क्लीनर पवन कृपाशंकर तिवारी (रा. वणी, जि. कोशांबी) हे डाळ घेण्यासाठी अकोल्यातील एमआयडीसी फेज-३ मधील गजानन भाला यांच्या दाल मिलमध्ये सोमवारी सायंकाळी आले होते. त्यांनी दाल मिलसमोर त्यांचा यूपी ७0 सीटी १११६ क्रमांकाचा ट्रक उभा केला. सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास ट्रकचालक विनोदकुमार व क्लीनर पवन यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने, पवनने ट्रकमधील लोखंडी सळई विनोदकुमारच्या डोक्यात घातली. यात विनोदकुमार गंभीर जखमी झाला. त्यानंतर पवनने तेथून पळ काढला. रात्रीपर्यंत ट्रकचालक जखमी अवस्थेत एमआयडीसी परिसरात फिरत होता. मंगळवारी सकाळी पोलिसांना तो बीके चौकातील पूजा उद्योगच्या प्रवेशद्वाराजवळ जखमी अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक व रक्ताने माखलेल्या जागेची पाहणी केली. यावेळी इन्व्हेस्टिगेशन कारलाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी ट्रकमधील लोखंडी सळई जप्त केली. सिव्हिल लाइनचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल चापले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचा क्लीनर पवन तिवारी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ अन्वये गुन्हा दाखल केला.
वेडा समजून केले दुर्लक्ष
ट्रकचालक विनोदकुमार हा जखमी अवस्थेत कुंभारी रोडवर फिरत होता. तो अर्धनग्न होता. त्याची दाढी वाढलेली होती. त्याने रस्त्यावरून जाणार्या दुचाकीस्वारांना, दाल मिलमधील कर्मचार्यांना मदत मागितली; परंतु त्याचा अवतार पाहून, हा कुणीतरी वेडा असावा म्हणून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
एका ट्रकचालकाने पाहिला त्यांच्यातील वाद
मुंबई येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रकचालक अब्दुल गणी सुलेमान हासुद्धा त्याचा ट्रक घेऊन तिथेच आला होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास विनोदकुमार व पवन तिवारी यांच्यात भांडण सुरू असल्याचे आपण पाहिले, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. किरकोळ वादातूनच पवन तिवारीने विनोदकुमारची हत्या केल्याचेही अब्दुल गणीने पोलिसांना सांगितले.