ट्रकचालकाच्या खून प्रकरणात क्लीनरला जन्मठेप

By Admin | Updated: June 14, 2017 00:26 IST2017-06-14T00:26:06+5:302017-06-14T00:26:06+5:30

एमआयडीसीत घडले होते हत्याकांड

In the trucker's murder case, cleaner's life imprisonment | ट्रकचालकाच्या खून प्रकरणात क्लीनरला जन्मठेप

ट्रकचालकाच्या खून प्रकरणात क्लीनरला जन्मठेप

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमधील फेज-२ मध्ये २०१५ मध्ये घडलेल्या ट्रकचालकाच्या खून प्रकरणातील आरोपी क्लीनरला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस पाच हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील राजरुपूर येथील रहिवासी तथा ट्रकचालक विनोदकुमार त्रिभुवनसिंह (५०) यांची २१ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांच्याच ट्रकवर क्लीनर म्हणून असलेला उत्तर प्रदेशातील कोसंबी जिल्ह्यातील वनी येथील रहिवासी पवनकुमार कृपाशंकर तिवारी याने लोखंडी टॉमी डोक्यावर मारून हत्या केली होती. टॉमी मारल्यानंतर विनोदकुमार पहाटेपासूनच रक्तबंबाळ अवस्थेत फिरत होता. त्याला मनोरुग्ण समजल्याने मदत मिळाली नाही. अशातच त्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना देण्यात आल्यानंतर २६ नोव्हेंबरच्या पहाटे त्यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला; मात्र क्लीनर तिवारी गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तिवारी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने विनोदकुमारचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सिव्हिल लाइनचे पीएसआय हर्षल चापले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पवनकुमार कृपाशंकर तिवारी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास चापले यांनी केल्यानंतर दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सादर केले. न्यायालयाने या खून प्रकरणात १३ साक्षीदार तपासल्यानंतर तसेच समोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपी पवनकुमार तिवारी याला विनोदकुमार यांच्या खूनप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील अ‍ॅड. विनोद फाटे यांनी काम पाहिले.

Web Title: In the trucker's murder case, cleaner's life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.