Triple talaq: The first crime in Akola district registerd in Balapur | तीन तलाक: अकोला जिल्ह्यातील पहिला गुन्हा बाळापुरात
तीन तलाक: अकोला जिल्ह्यातील पहिला गुन्हा बाळापुरात

बाळापूर (अकोला): वाद मिटविण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत पत्नीला तोंडी तीन तलाक देणाºया पतीविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ४ नुसार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अकोला जिल्ह्यात तीन तलाक कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
बाळापूर शहरातील राहणाºया फिर्यादी महिलेचे २०१३ मध्ये मंगरुळपीर येथील मोहंमद जाफर मोहंमद तस्लिम याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना तीन अपत्ये आहेत. विवाहितेला तिचा पती, सासू, सासरे, नणंद, किरकोळ कारणावरून तसेच दिसायला चांगली नाही म्हणून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते. तसेच सतत तिला टोचून बोलत होते. पती मोहंमद जाफर हा तू मला नको, मी दुसरे लग्न करतो, तू निघून जा, असे नेहमी बोलत होता व शिवीगाळ करीत होता. या त्रासाला कंटाळून ती मुलासह माहेरी बाळापूर येथे राहायला आली. २१ आॅगस्ट दोन्हीकडील मंडळी त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी बाळापूरला आले होते; परंतु या बैठकीत वाद न मिटता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी फिर्यादी महिलेस तिच्या पतीने तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट दिला. विवाहितेच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी पतीसह सासरा मोहंमद तस्लिम, सासू अलिया निसा, नणंद शाहीन परवीन तसेच नातेवाईक अब्दुल गणी अब्दुल अजीज यांच्याविरुद्ध कलम ४९८ (अ), ५०४, ३४, भादंवि मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ नुसार तत्काळ गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नौशाद करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

 


Web Title: Triple talaq: The first crime in Akola district registerd in Balapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.