सुतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 18:02 IST2021-01-30T18:01:21+5:302021-01-30T18:02:21+5:30
Mahatma Gandhi News ज्येष्ठ सर्वोदयी मंडळींनी सुतकताई करून राष्ट्रपित्यास अभिवादन केले.

सुतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन
अकोला: राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील गांधी जवाहर बागेत जिल्हा सर्वोदय मंडळाच्यावतीने सुतकताई यज्ञ व चरखा दुरुस्ती कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी ज्येष्ठ सर्वोदयी मंडळींनी सुतकताई करून राष्ट्रपित्यास अभिवादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार व जिल्हा सेवा समितीचे महादेवराव हुरपडे,कापुस ते कापड अभियान प्रमुख प्रल्हादराव नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गांधीजींच्या विधायक विचारातुन कार्यकर्त्यांना जगण्याचे बळ मिळते, असे मत छात्र युवा संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते जयकृष्ण वाकोडे यांनी व्यक्त केले. सूतकताई केल्याने शेतकरी कष्टकरी बांधवाच्या श्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी केले.सूतकताई करुन खादी वापरु इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा सर्वोदय मंडळ प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चरखा कार्यशाळा घेणार असल्याची माहिती सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी अध्यक्षीय भाषणातुन दिली.
कार्यक्रमाचे संचालन डाॅ.मिलींद निवाणे यांनी केले.आभारप्रदर्शन महेश आढे यांनी केले. यावेळी अनिल मावळे, नितीन भरणे केळीवेळी,रामदास शेळके,अंबादास वसु,उमेश बंडुजी गाडगे,श्रीकृष्ण माळी,रोहित तारकस, उमा झुनझुनवाला,रामभाऊ रोडे यांनी सूतकताई यज्ञात सहभाग घेतला. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.