अकोला पंचायत समितीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तकासाठी अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:09 IST2019-08-13T14:09:08+5:302019-08-13T14:09:17+5:30
शिक्षकांना अंतिम वेतन प्रमाणपत्र व मूळ सेवापुस्तकासाठी अडवणूक करण्याचा प्रकार अकोला पंचायत समितीमध्ये सुरू असल्याने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अकोला पंचायत समितीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तकासाठी अडवणूक
अकोला: पंचायत समितीमधून बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना अंतिम वेतन प्रमाणपत्र व मूळ सेवापुस्तकासाठी अडवणूक करण्याचा प्रकार अकोलापंचायत समितीमध्ये सुरू असल्याने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा चांगलाच सहभाग असल्याने हा प्रकार घडत आहे. त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया तसेच अतिरिक्त ठरवून समायोजनांतर्गत अकोला पंचायत समितीमधून इतर पंचायत समितीमध्ये शिक्षकांची बदली झाली; मात्र त्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र व मूळ सेवापुस्तक संबंधित पंचायत समितीला पाठवण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांना जुलै २०१९ चे वेतन मिळाले नाही. तसेच सातव्या वेतन आयोगाची थकबाकीही मिळाली नाही. या प्रकाराला शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिक जबाबदार आहेत. शिक्षकांचे सेवापुस्तक अद्ययावत करण्यासाठी अर्थपूर्ण बाब महत्त्वाची आहे. त्यामुळे ते काम केलेले नाहीत. संबंधित शिक्षकांमध्येही चर्चा आता जोरात आहे. पंचायत समितीमधील दोन कर्मचाऱ्यांनी हा प्रकार ताणून धरला आहे. त्यातून शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शिक्षकांना वेतन, सातवा वेतन आयोगापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.