करवाढीच्याविरोधात शिवसेनेने फुंकले रणशिंग
By Admin | Updated: May 26, 2017 03:05 IST2017-05-26T03:05:01+5:302017-05-26T03:05:01+5:30
हायकोर्टात याचिका दाखल करणार; पत्रकार परिषदेत माहिती

करवाढीच्याविरोधात शिवसेनेने फुंकले रणशिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिका प्रशासनाच्या करवाढीविरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकले. अकोलेकरांवर लादलेली कर वाढ कदापि मान्य नसल्याचे सांगत याविरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिक ा प्रशासनाने दर तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्या-टप्प्याने कर वाढ करणे अपेक्षित आहे. १९९८ पासून प्रशासनाने मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम मनपाच्या उत्पन्नावर झाला. याचे खापर अकोलेकरांवर फोडून प्रशासनाने एकाच दमात कर वाढ करून अकोलेकरांवर ‘झिजिया’ कर लादला. प्रशासनाने ही कर वाढ त्वरित मागे घ्यावी,अन्यथा अकोलेकरांच्या भावनांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता असल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी यावेळी सांगितले. २००१-०२ मध्ये मनपाचे तत्कालीन आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी अशाच प्रकारे वाढीव कराच्या नोटिस जारी केल्या होत्या. त्यावेळी आम्ही मनपात नगरसेवक असताना या विषयावर बैठक घेऊन सामंजस्याने तोडगा काढला होता. मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी कर वाढ आवश्यक असली, तरी ती अवाजवी नको. मनपाची कर वाढ पाहता नागरिक अस्वस्थ झाले आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, प्रशासनाने भाडेपट्ट्यावर दिलेल्या दुकानांना चक्क एक ते सव्वा लाख रुपये भाडे वाढ केली.
मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विलंब करणाऱ्या प्रशासनाने एकूण कर रकमेच्या दीडपट वाढ करावी, अन्यथा मनपाच्या निर्णयाविरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आ. बाजोरिया यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मनपाचे गटनेता राजेश मिश्रा, अकोला पूर्वचे शहर प्रमुख अतुल पवनीकर, नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक शशी चोपडे, मंगेश काळे, गजानन चव्हाण, तरुण बगेरे, योगेश गीते, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, दिनेश सरोदे, संजय भांबेरे, धनंजय गावंडे आदी उपस्थित होते.
विधान परिषदेत करणार चर्चा!
मालमत्ताधारकांना एकूण कर रकमेच्या दीडपट किंवा दोनपट कर वाढ करता येते. मनपाने कर वाढ करताना जे निकष लावले, ते चुकीचे असल्याचे सांगत हा मुद्दा विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित करणार असल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी स्पष्ट केले.
मनपाची मालकी नाही!
शहरात मनपाच्या मालकीच्या व्यावसायिक संकुलांमधील गाळेधारकांना डोळे विस्फारणारी भाडे वाढ करण्यात आली. यामध्ये विनयकुमार पाराशर मार्केट, दाणा बाजार मार्केटची जागा मनपाच्या मालकीची नसल्याचे सांगत आ. बाजोरिया यांनी त्या जागेचे केवळ व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मनपाकडे असल्याची माहिती दिली.