कौलखेड मार्गावर वाहतूक कोंडी; रस्ता रुंदीकरणावर शिक्कामोर्तब, रस्त्याचे ३० फुट होणार रुंदीकरण
By आशीष गावंडे | Updated: August 9, 2023 18:02 IST2023-08-09T18:02:24+5:302023-08-09T18:02:34+5:30
शहरातील खदान ते कौलखेड ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

कौलखेड मार्गावर वाहतूक कोंडी; रस्ता रुंदीकरणावर शिक्कामोर्तब, रस्त्याचे ३० फुट होणार रुंदीकरण
अकोला : शहरातील खदान ते कौलखेड ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाहनचालकांची होणारी गैरसोय पाहता या रस्त्याचे महानपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेतल्याची माहिती आहे. हा रस्ता सुमारे ३० फुट रुंद केला जाणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने १४ कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रमुख सहा रस्त्यांचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचा निर्णय घेतला होता. यामध्ये खदान ते कौलखेड ते खडकी या रस्त्याचा समावेश नव्हता. वर्तमानस्थितीत या मार्गावरुन बार्शीटाकळी तालुका तसेच वाशिम ते यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रवासी व जडवाहतूक सुरु आहे. परंतु हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. यामुळे मनपा क्षेत्रातील खदान ते शिवापूर भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उशिरा का होईना, या समस्येवर रस्ता रुंदीकरणाचा तोडगा काढण्यात आला आहे.
दोन्हीकडेला प्रत्येकी १५ फुट रुंदीकरण
खदान ते कौलखेड ते शिवापूर पर्यंत रस्त्याच्या दोन्हीकडेला प्रत्येकी १५ फुट रुंदीकरण केले जाणार आहे. यामुळे दैनंदिन वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविल्यास या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महान पर्यंत रस्ता रुंदीकरण
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने शहराच्या चारही बाजूकडील रस्त्यांचे चाैपदरीकरण केल्यामुळे वाहतूक व्यवस्था गतीमान झाली आहे. दरम्यान, अकोला ते महान या मार्गावरील व्यस्त वाहतूक लक्षात घेता खदान ते महान पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा जिल्हावासियांसाठी मोठा दिलासा मानला जाइल.