ट्रॅक्टर विहिरीत कोसळला
By Admin | Updated: March 26, 2016 02:19 IST2016-03-26T02:19:26+5:302016-03-26T02:19:26+5:30
ब्लास्टिंगच्यावेळी घडली दुर्घटना; एक ठार, दोन गंभीर.

ट्रॅक्टर विहिरीत कोसळला
मलकापूर(जि. बुलडाणा) : ट्रॅक्टर क्रेनच्या सहाय्याने ४७ फूट विहिरीत ड्रिलिंगचे काम सुरु असताना कंपनामुळे ट्रॅक्टर मागे सरकत विहिरीत घसरल्याने विहिरीत काम करणारे तिघे गंभीर जखमी झाले तर यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना धूलिवंदनच्या दिवशी पान्हेरा बहापुरा शेतशिवारात घडली.
किसन श्रीकृष्ण सपकाळ यांच्या पान्हेरा शिवारातील शेतातील विहिरीत ब्लास्टिंगसाठी ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९-५३१३ ने ड्रिलिंगचे काम सुरु होते. ट्रॅक्टरचालक बंडू इंगळे, क्रेनमालक संजय किसन पांडे व नीलेश देशमुख आदी विहिरीलगत होते. तर कैलास तुळशिराम गिर्हे वय ३७, विनोद शंकर गिरी ३0 दोघे रा. वडनेर भोलजी व बंडू इंगळे हे तिघे विहिरीत उतरुन काम करीत होते.
ड्रिलिंगच्या कामास सुरुवात झाल्यानंतर कंपनामुळे ट्रॅक्टर मागे सरकत सरळ विहिरीत घसरल्याने विहिरीतील तिघे जण गंभीर जखमी झाले. या तिघांनाही उपचारासाठी मलकापुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान कैलास गिर्हे यांची प्राणज्योत मालवली, तर दोघांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
याप्रकरणी संजय पांडे वय ४६ रा. वडनेर भोलजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अप. नं. १२0/१६ भादंवि ३३७, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गवारगुरु करीत आहेत.