पाणीपुरवठा हस्तांतरणावर मुंबईत आज बैठक

By Admin | Updated: January 20, 2015 00:42 IST2015-01-20T00:42:20+5:302015-01-20T00:42:20+5:30

अकोला महापालिकेचे अधिकारी मुंबईकडे रवाना.

Today's meeting in Mumbai on water supply transfer | पाणीपुरवठा हस्तांतरणावर मुंबईत आज बैठक

पाणीपुरवठा हस्तांतरणावर मुंबईत आज बैठक

अकोला : शहराची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा तिढा सुटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. या मुद्दय़ावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात २0 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली असून, याकरिता सोमवारी सायंकाळी मनपाचे अधिकारी मुंबईकरिता रवाना झाले. शहराला महान धरणातून पाणीपुरवठा केला जातो. २00७ पर्यंत अकोलेकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेकडून पाणीपुरवठा केला जात होता. तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी पाणीपट्टी वसुलीपासून मनपाला मोठे आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल, या उद्देशातून २00७ मध्ये ही योजना मनपाकडे वळती केली. अवैध नळ कनेक्शनची वाढती संख्या व थकीत पाणीपट्टीमुळे मनपाच्या या योजनेला घरघर लागली. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीन कालबाह्य झाल्याने त्यामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले. यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे ही योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात अनेकदा लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, दिलीप सोपल यांच्यासोबत आ. बाजोरिया यांनी मनपा व मजीप्राच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय घडवून आणल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांनी ही योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्याचा ठराव शासनाकडे पाठवला होता. सुरुवातीला ही योजना स्वीकारण्याची तयारी दर्शविणार्‍या मजीप्राने कालांतराने मात्र केवळ महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल-दुरुस्तीचा प्रस्ताव समोर ठेवला. यामुळे हस्तांतरणाचा मुद्दा बाजूला सारला गेला. आता पुन्हा ही योजना स्वीकारण्याची तयारी मजीप्राने दाखवल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात मनपा व मजीप्राच्या संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. मनपाचे शहर अभियंता अजय गुजर व जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे सोमवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Web Title: Today's meeting in Mumbai on water supply transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.