शाळा मान्यतेची शिक्षण विभागाकडून आजपासून तपासणी
By Admin | Updated: November 13, 2014 23:39 IST2014-11-13T23:39:23+5:302014-11-13T23:39:23+5:30
शाळांची होणार आकस्मिक पाहणी.

शाळा मान्यतेची शिक्षण विभागाकडून आजपासून तपासणी
अकोला : शिक्षण विभागाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाचे पथक शुक्रवार १४ नोव्हेंबरपासून राज्यभर फिरणार आहे. हे पथक आकस्मिक कोणत्याही शाळेची तपासणी करणार आहे.
शिक्षण विभागाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करण्याच्या हमीवर शाळांना मान्यता दिली जाते. प्रत्यक्षात शाळा सुरु केल्यानंतर नियम व अटींची पूर्तता केली जात नाही. याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुमार दर्जाची असते. काही शाळा तर मान्यता नसतानाही सुरु असतात. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शाळांच्या मान्यतेसह, विद्यार्थ्यांची गुणवत्तादेखील तपासणी जाणार आहे.
तपासणीसाठी शिक्षण संचालक व सहसंचालकांचे पथक गठीत करण्यात आले असून, हे पथक प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना भेटी देणार आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता, हे पथक शाळांमध्ये धडकणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी एक बैठक घेऊन याबाबतचे आदेश शिक्षणाधिकार्यांना दिले आहेत.