मनपाची आज अर्थसंकल्पीय सभा
By Admin | Updated: April 15, 2015 01:47 IST2015-04-15T01:47:22+5:302015-04-15T01:47:22+5:30
स्थगित अर्थसंकल्पीय सभा पुन्हा आयोजन.

मनपाची आज अर्थसंकल्पीय सभा
अकोला : महापालिकेचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात तयार करून ठेवणे अपेक्षित असताना मार्च महिना उलटल्यावरही प्रशासनाला यश आले नाही. प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे मार्च महिन्यात आयोजित केलेली अर्थसंकल्पीय सभा स्थगित करण्याची नामुष्की प्रशासनासह सत्तापक्षावर ओढवली. बुधवारी पुन्हा स्थगित सभेचे आयोजन करण्यात आले असून, प्रशासनाने जास्त डोकेदुखी न ठेवता अंदाजपत्रकात सरासरी दहा टक्क्यांची वाढ केल्याची माहिती आहे. महापालिकेचा २0१२-१३ मध्ये २१२ कोटी, तर २0१३-१४ आर्थिक वर्षासाठी २९७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. यामुळे मनपाची वित्तीय तूट प्रचंड वाढली. ही बाब लक्षात घेता, २0१४-१५ आर्थिक वर्षासाठी तत्कालीन आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी २४0 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. अर्थात २0१३-१४ च्या अर्थसंकल्पापेक्षा ५७ कोटींनी ही रक्कम कमी करण्यात आली होती. मनपाची आर्थिक स्थिती, उत्पन्नवाढीचे स्रोत लक्षात घेता, आयुक्त सोमनाथ शेटे यांचा कस लागणार, हे निश्चित आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार अर्थ व वित्त विभागातील कर्मचार्यांनी २0१४-१५ चे सुधारित व २0१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक तयार केले. बुधवारी महापौरांनी अर्थसंकल्पीय विशेष सभेचे आयोजन केले असून, यामध्ये अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा केली जाईल. दरम्यान, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मंगळवारी सायंकाळी सर्व विभागप्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला.