आज अकोल्यात राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा
By Admin | Updated: September 26, 2014 01:57 IST2014-09-26T01:57:01+5:302014-09-26T01:57:01+5:30
राज्याच्या आठ विभागातून १६ विद्यार्थ्यांचा सहभाग.

आज अकोल्यात राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा
अकोला: कोलकातास्थित राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय, पुणेस्थित महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नागपूरस्थित राज्य विज्ञान शिक्षण संस्था आणि अमरावतीस्थित शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ३३ व्या राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी अकोला येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्याच्या आठ महसुल विभागांमधील १६ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
मेळाव्यात पुणे, कोल्हापूर, नासिक, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, लातूर व अमरावती या आठ विभागातील प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण १६ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावर्षीच्या विज्ञान मेळाव्याचा विषय ह्यकृषी क्षेत्रात नवप्रवर्तन: अपेक्षा व आव्हानेह्ण हा असून, सहभागी विद्यार्थ्यांना सहा मिनिटात त्यांचे विचार मांडावे लागणार आहेत. त्याशिवाय लेखी क्षमता चाचणी व तोंडी परीक्षाही घेण्यात येणार आहे. मेळावा इयत्ता आठवी, नववी व दहावीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी खुला राहणार आहे. मेळाव्याच्या समारोपात बाल वैज्ञानिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अमरावती विभागीय श्क्षिण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर व शिक्षण उपसंचालक राम पवार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. रवींद्र भास्कर यांनी केले आहे.
अकोल्यातील प्रभात किडस् संकुल येथे २६ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता मेळाव्याचे उदघाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र दाणी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे भुषवतील.