लोकमत अकोला आवृत्तीचा आज वर्धापन दिन सोहळा
By Admin | Updated: March 16, 2016 08:37 IST2016-03-16T08:37:11+5:302016-03-16T08:37:11+5:30
अकोला येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती.

लोकमत अकोला आवृत्तीचा आज वर्धापन दिन सोहळा
अकोला : वर्हाडच्या मातीशी, शेतकर्यांशी जीवाभावाचे नाते जोडणार्या दैनिक लोकमतच्या अकोला आवृत्तीला बुधवार, १६ मार्च रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहेत. वर्धापन दिन आणि आवृत्तीच्या नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, असा दुग्धशर्करा योग यंदा जुळून आला आहे. यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमतचा १८ वा वर्धापन दिन सोहळा आणि स्नेहनगर (गीतानगर) स्थित नूतन कार्यालयाचे उद्घाटन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. वर्धापन दिन सोहळय़ाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. रविवार, २0 मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत अकोल्यातील स्वराज्य भवन येथे दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय, रविवारी सायंकाळी ६ वाजता मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदानावर प्रख्यात पार्श्वगायिका वैशाली सामंतचा जल्लोष २0१६ हा रंगारंग कार्यक्रम खास सखी मंच सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, २२ मार्च रोजी एमआयडीसी परिसरातील लोकमत भवनच्या भव्य प्रांगणामध्ये अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील एजन्ट, वार्ताहर बंधूंसाठी सकाळी १0.३0 वाजता स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वर्षभरात विशेष कामगिरी करणार्या तिन्ही जिल्ह्यातील एजन्ट-वार्ताहर बंधूंचा या कार्यक्रमात गुणगौरव करण्यात येईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.