टायर फुटल्याने कंटेनर पुलावरून खाली आदळला
By Admin | Updated: March 15, 2016 02:36 IST2016-03-15T02:28:43+5:302016-03-15T02:36:35+5:30
खडकीनजीकची घटना: कंटेनरचे दोन भाग झाले वेगळे, दोघे गंभीर जखमी

टायर फुटल्याने कंटेनर पुलावरून खाली आदळला
अकोला: चंद्रपूरवरून मुंबई येथे जात असलेला व कोळशाने भरलेल्या कंटेनरचे टायर फुटल्याने सदर ट्रक व कंटेनर खडकीनजीकच्या पुलावरून खाली आदळल्याची घटना सोमवारी सकाळीच घडली. या अपघाताममध्ये ट्रकचे दोन वेगळे भाग झाले असून, ट्रकमधील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
कोळशाने भरलेला १२ टायरचा एम एच ४३ यू ५४७५ क्रमांकाचा ट्रक कंटेनर सोमवारी राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना सदर ट्रक कंटेनरचे टायर अचानक फुटले. त्यामुळे ट्रकचालक हरवना सिंह चरण सिंह यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खडकीनजीकच्या पुलावरून खाली बाश्रीटाकळी रोडच्या बाजूला कोसळला.
बाश्रीटाकळी रोडवरून वाहनाची ये-जा सुरू नव्हती अन्यथा मोठी दुर्घटना घडून यामध्ये जीवितहानी झाली असती; मात्र सुदैवाने या रोडवर वाहन नसल्याची मोठी हानी झाली नाही. ट्रक व कंटेनर खाली कोसळल्याने यामध्ये राजस्थान येथील रहिवासी हरवना सिंह व ट्रकचा क्लीनर दिनेश रमेशचंद्र टेलर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना मदत केली तर वाहतूकही सुरळीत केली. अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने तसेच पोलीस वेळेत पोहोचल्याने ट्रकमधील कोळसा चोरी गेला नाही.