उद्घाटनाचा वाद ठरला काळ!

By Admin | Updated: November 4, 2015 02:44 IST2015-11-04T02:44:57+5:302015-11-04T02:44:57+5:30

किशोर खत्री हत्याकांड; संशयाची सुई रणजित चुंगडेंकडे.

The time of the inauguration was a contest! | उद्घाटनाचा वाद ठरला काळ!

उद्घाटनाचा वाद ठरला काळ!

अकोला - चित्रा टॉकिजच्या जागेवर उभारण्यात आलेल्या कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाच्या तारखेवरून दिल्लीतील बिल्डर्स व रणजितसिंह चुंगडे यांच्यात झालेल्या वादात मध्यस्थी करणारे किशोर खत्री यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. त्यामुळे कॉम्प्लेक्सच्या मुहूर्तावरून उद्भवलेला वादच किशोरच्या जीवनाचा काळ ठरला. चित्रा टॉकिजच्या जागेवर भव्य कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. सदर कॉम्प्लेक्स दिल्लीतील काही बिल्डर्स व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व मनसेचे माजी जिल्हाप्रमुख रणजितसिंह चुंगडे यांच्या मालकीचे असून, यामध्ये किशोर मदनलाल खत्री मध्यस्थ होते. दिल्लीतील बिल्डर्स सदर कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरविण्यासाठी सोमवारी अकोल्यात आले. त्यांनी कॉम्प्लेक्समधील सर्व गाळेधारकांना बोलावून एक बैठक घेऊन उद्घाटनासाठी मुहूर्त निश्‍चित करण्याचा प्रयत्न केला; मात्र या मुहूर्त निश्‍चितीवरून बिल्डर्स व रणजितसिंह चुंगडे यांच्यात वाद झाले. सदर वाद किशोर मदनलाल खत्री यांनी मिटविले. त्यानंतर मंगळवारी दुपारी रणजितसिंह चुंगडे व किशोर खत्री यांनी कॉम्प्लेक्सची पाहणी केली. यावेळी चुंगडे लघुशंकेला जातो, असे सांगून घरी निघून गेले. काही वेळातच म्हणजे दुपारी १ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास चुंगडे एमएच ३0 पी ३0४0 क्रमांकाची सफारी गाडी घेऊन कॉम्प्लेक्ससमोर आले. किशोर खत्री यांना बाहेरून फिरून येऊ, असे म्हणून खत्री यांना ते सोबत घेऊन गेले. त्यानंतर ५ वाजताच्या सुमारास खत्री यांचा मृतदेह सोमठाणा शेतशिवारामध्ये असल्याची माहिती त्यांचे बंधू दिलीप खत्री यांना मिळाली. अशा आशयाची तक्रार दिलीप खत्री यांनी मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास जुने शहर पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Web Title: The time of the inauguration was a contest!