तिढा तुरीचा : ‘डीएमओं’ना घेराव!

By Admin | Updated: April 25, 2017 01:30 IST2017-04-25T01:20:36+5:302017-04-25T01:30:17+5:30

शिवसेनेची आक्रमक भूमिका : अंगावर फेकली तूर, मोजमापाच्या प्रतीक्षेतील तूर खरेदी करण्याची मागणी

Tiadha Takira: 'DMs' encircle! | तिढा तुरीचा : ‘डीएमओं’ना घेराव!

तिढा तुरीचा : ‘डीएमओं’ना घेराव!

अकोला : खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत तुरीचे टॅ्रक्टर उभे असताना, ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत, जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवरील शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप सुरू करण्याची मागणी करीत, सोमवारी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना (डीएमओ) घेराव घातला. तसेच ‘डीएमओं’च्या अंगावर तूर फेकून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदीत जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून तूर उत्पादक शेतकरी तुरीच्या मोजमाच्या प्रतीक्षेत असताना, ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे खरेदी केंद्रांवर तुरीचे ट्रॅक्टर मोजमापाविना उभे आहेत. त्यामुळे या मुद्यावर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत, सोमवारी दुपारी अकोल्यातील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवरील शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप सुरू करण्यात यावे, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांना घेराव घातला. नाफेडद्वारे २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून तुरीची खरेदी बंद करण्यात आली; मात्र २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर मोजमाच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीच्या मोजमापाचे काय, दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप का करण्यात आले नाही, अशी विचारणा करीत संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या अंगावर तूर फेकली. तूर खरेदीत मोजमापासंबंधी दिरंगाईच्या मुद्यावर जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांना यावेळी चांगलेच धारेवर धरण्यात आले. तसेच खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या टॅ्रक्टरमधील तुरीचे मोजमाप सुरू करून, तूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार संजय गावंडे, शिवसेनेचे सहाय्यक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, सेवकराम ताथोड, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडू ढोरे, महिला जिल्हा संघटक ज्योत्स्ना चोरे, अतुल पवनीकर, राजेश्वरी शर्मा, शुभांगी किनगे, नीलिमा तिजारे, प्रदीप गुरुखुद्दे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह तूर उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

खरेदीत दिरंगाई; ‘डीएमओं’ना धरले धारेवर!
‘नाफेड’द्वारे तूर खरेदीत गत दीड महिन्यांपासून खरेदी केंद्रांवर तुरीचे ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति दिवस ५०० रुपयेप्रमाणे ट्रॅक्टरचे भाडे द्यावे लागत आहे; मात्र दीड महिन्यांपासून, तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा करावी लागत आहे. तूर खरेदीत मोजपासाठी झालेल्या दिरंगाईच्या मुद्द्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांना चांगलेच धारेवर धरले.

लक्झरी बसमध्ये बसवून ‘डीएमओं’ना नेले बाजार समितीमध्ये!
नाफेडद्वारे तूर खरेदी बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर मोजमाच्या प्रतीक्षेत तूर उत्पादक शेतकरी आणि तुरीचे उभे असलेले ट्रॅक्टर, यासंदर्भात चर्चा केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाजपेयी यांना लक्झरी बसमध्ये बसवून तूर उत्पादक शेतकऱ्यांसह अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेले. तेथे मोजपाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीच्या ट्रॅक्टरची पाहणी करण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रावरील तुरीचे मोजमाप करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

शासनाकडून परवानगी मिळताच मोजमाप; जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन!
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेट देऊन, तूर खरेदीच्या मुद्द्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. खरेदी केंद्रांवरील तुरीच्या मोजमापासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शासनाकडून परवानगी मिळताच नाफेडद्वारे खरेदी केंद्रांवरील तुरीचे मोजमाप सुरू करण्यात येणार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी दिले.

Web Title: Tiadha Takira: 'DMs' encircle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.