बुलडाणा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: July 23, 2014 00:30 IST2014-07-23T00:30:03+5:302014-07-23T00:30:03+5:30
देऊळगावराजामध्ये जबरी चोरी : खामगावात रोकड लंपास

बुलडाणा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. भुरट्या चोरांसोबतच अट्टल चोरटेही सरसावले आहेत. आज २२ जुलैच्या पहाटे देऊळगावराजा येथे चोरट्यांनी शस्त्राच्या धाकावर लुटमार केली असून, बुलडाणा तालुक्यातील धाड येथे पानटपरी फोडली. संध्याकाळी ४ च्या सुमारास खामगाव येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये अंगावर घाण टाकून ७१ हजाराची रोकड लंपास केली. चोरांच्या वाढलेल्या हिमतीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चोरांना जिल्हा मोकळा, असेच चित्र सध्या दिसत आहे.
** देऊळगावराजा : शहरातील चिखली रोडवर असलेल्या तीन कॉलनी वसाहतीत अज्ञात चार चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत शस्त्राच्या धाकावर लुटमार करत एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी पहाटे ४ ते ४.३0 वाजेच्या सुमारास घडली.
अज्ञात चोरट्यांनी रात्री १.३0 वाजेपासून आदर्श कॉलनी, उंबरखेड रस्त्यावरील शिवाजी पार्क आणि विजय वाईन बार समोरच्या नवीन कॉलनीला आपले लक्ष्य बनवले. यावेळी शिवाजी पार्क परिसरातील मान्टेच्या घरात भाडेकरू असलेल्या गिते नामक विद्यार्थ्याच्या घरात प्रवेश करून सामान, मोबाईल आणि २00 रूपये घेवून गेले. त्यानंतर आदर्श कॉलनीत घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरल्याने परत डिघोळे यांच्याकडे असलेले भाडेकरू टेकाळे यांच्या घरात प्रवेश करून डिजीटल कॅमेरा लंपास केला. डॉ.अतुल गिते यांच्या हॉस्पीटलमध्ये मेडिकल स्टोअर व्यावसायिक संजय सखाराम नागरे यांचे घर डिघोळेंच्या समोर आहे. नागरेंच्या घरात बाजुचे लोखंडी ग्रील तोडून प्रवेश केला. मात्र संजय नागरे यांना जाग आल्याने त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता आधीच चिडलेल्या चारही चोरट्यांनी संजय नागरे यांच्यावर हल्ला चढवला. संजय नागरे यांच्यावर चाकूने मान, पाठ आणि पोटावर वार करत पायावर काठीने मारल्याने ते गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशात असलेले सात हजार रूपये पॅन्टसह घेवून पलायन केले. संजय नागरे यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले. त्यांना तातडीने दे.राजा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथम दिपक हॉस्पीटल नंतर आधार हॉस्पीटल जालना येथे हलविण्यता आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संजय नागरे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हिवाळे आणि कर्मचारी घटनास्थळाकडे धावले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्वेता खेडकर दाखल झाल्या. श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे मोटारसायकल किंवा चारचाकी वाहनातून पसार झाल्याने शोध लागला नाही. संजय नागरे यांचे भाडेकरू भागवत रामदास चेके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरूध्द जबरी चोरी अप.क्र. ६९/१४ कलम ३९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
** अंगावर घाण टाकून ८१ हजार लंपास
खामगाव : बँकेत भरावयास आणलेली शेतकर्याची ८१ हजार रुपये रोकड चोरट्यांनी अंगावर घाण टाकून लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास स्थानिक पंजाब नॅशनल बँकेत घडली. प्राप्त माहितीनुसार घाटपुरी येथील श्रीधर कॉलनीतील रहिवासी दशरथ भगवंतराव चर्हाटे (वय ५४) हे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदुरा रोडवरील पंजाब नॅशनल बँकेत ८१ हजार रुपये भरावयास आले. दुपारी मध्यान्ह भोजनाची वेळ झाल्याने कॅशीयरने नंतर पैसे भरा, असे सांगितल्याने दशरथ चर्हाटे हे बँकेबाहेर उभे राहिले. दरम्यान, चोरट्यांनी ही संधी साधून दशरथ चर्हाटे यांच्या अंगावर घाण टाकली व काका ही घाण साफ करा, असे म्हणून चर्हाटे हे घाण साफ करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील ८१ हजार रुपये रोकड लंपास केली. पैसे चोरी झाल्याची माहिती नंतर चर्हाटे यांना समजताच तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या घटनेबाबत दशरथ चर्हाटे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
** स्वीटमार्ट फोडून ६0 हजाराचा माल लंपास
धाड : स्थानिक बसस्टँण्ड लगत असणार्या एका पान मसाला व स्वीटमार्ट दुकानात अज्ञात चोरट्यांनी २१ जुलैच्या रात्री दुकान फोडून पानमसाला मटेरीयलसह सिगारेट व इतर साहित्य असा अंदाजे ६0 हजाराचा माल लंपास केल्याची माहिती आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, धाडच्या बसस्थानकालगत म.वकील म.जलील यांचे अमर पान मसाला व स्वीटमार्ट सेंटर असून, २१ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला व दुकानामधून अंदाजे ६0 हजाराचा माल लंपास केला. सदर घटना पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. यासंदर्भात कुणीही तक्रार दिली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)