चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: May 22, 2015 01:45 IST2015-05-22T01:45:32+5:302015-05-22T01:45:32+5:30

पारसमध्ये पाच घरफोड्या: चार लाखांचा मुद्देमाल लंपास.

Thunderbolt | चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ

अकोला/पारस : जिल्ह्यात गत एक महिन्यापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सातत्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरिक धास्तावले आहेत. अकोला शहरातील तीन ते चार चोर्‍यानंतर पिंपळखुटा व बुधवारी पारस येथे चोरट्यांनी डल्ला मारला. पारस येथील पारसनाथ मंदिर व राम मंदिर परिसरात २0 मेच्या मध्यरात्रीनंतर तब्बल पाच घरांमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४ लाख १५ हजार १५0 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या चोर्‍यांच्या तपासासाठी पोलिसांनी श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. परंतु, श्‍वानपथकाला चोरट्यांचा शोध घेण्यात अपयश आले. या चोर्‍यांमुळे पारस गावासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारसनाथ मंदिर परिसरातीलच अब्दुल नजीर अब्दुल मजीद यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख ५0 हजार रुपये, असा एकूण १ लाख ७ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. राममंदिर परिसरातील रहिवासी ज्ञानदेव कवरकार यांच्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोकड, असा एकूण १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरला. राममंदिर परिसरातीलच गणेश लांडे यांच्या घरातून चांदी व रोख रक्कम, असा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, तर त्याच परिसरातील अजय लांडे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. पण, तेथे सोने-चांदी व रोख रक्कम मिळून आली नाही. अखेर घरमालकाचा ८00 रुपये किमतीचा मोबाइल चोरण्यावरच चोरट्यांनी समाधान मानले या चोरीप्रकरणी सर्वच जणांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.चे ४५७ व ३८0 कलमान्वये गुन्हा नोंद केला. या चोर्‍यांची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार काळे, ठाणेदार घनश्याम पाटील, पोलीस पाटील गजानन दांदळे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.