हुंड्यासाठी गळा दाबून हत्या, पतीसह तिघांची जन्मठेप कायम
By Admin | Updated: July 15, 2014 00:06 IST2014-07-15T00:06:21+5:302014-07-15T00:06:21+5:30
हायकोर्ट : बुलडाणा जिल्ह्यातील घटना

हुंड्यासाठी गळा दाबून हत्या, पतीसह तिघांची जन्मठेप कायम
बुलडाणा: अवघ्या तीन हजार रुपये हुंड्यासाठी विवाहितेची गळा दाबून हत्या करणार्या तीन आरोपींची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील आहे. संतोष प्रकाश जाधव (२५), माला अजाबराव शंखे (५५) व प्रकाश रामभाऊ जाधव (४६) अशी आरोपींची नावे असून ते सर्व अमदापूर, ता. चिखली येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव शारदा असून ती शेगाव येथील मनोहर शंखेची कन्या होती. ६ मार्च २00९ रोजी तिचे संतोषसोबत लग्न झाले होते. आरोपी प्रकाश संतोषचा बाप असून माला आत्या होय. बुलडाणा सत्र न्यायालयाने ३0 एप्रिल २0११ रोजी आरोपींना भादंविच्या कलम ३0२ (हत्या)अंतर्गत जन्मठेप व १000 रुपये दंड, कलम ३0४-बी (हुंडाबळी) अंतर्गत १0 वर्षे सश्रम कारावास व १000 रुपये दंड, कलम २0१ (पुरावा नष्ट करणे)अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व १000 रुपये दंड, तर हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास व ५00 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता, आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. अमदापूर येथे राहणारा शारदाचा मामा अशोक चौरेने पाच हजार रुपये हुंड्याच्या मोबदल्यात हे लग्न जोडले होते. खटल्यातील माहितीनुसार, शारदाला सुरुवातीचे तीन-चार महिने चांगल्या पद्धतीने वागविण्यात आले. यानंतर हुंड्याची उर्वरित रक्कम तीन हजार रुपयांसाठी तिचा छळ केला जाऊ लागला. २८ एप्रिल २0१0 रोजी आरोपींनी शारदाची गळा दाबून हत्या केली व घरामागच्या विहिरीत मृतदेह फेकून दिला. यानंतर संतोषने शारदा हरविल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दुसर्या दिवशी सकाळी शारदाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. शवविच्छेदन अहवालात शारदाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. मनोहर शंखेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. तपासानंतर जेएमएफसी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. उच्च न्यायालयात शासनातर्फे एपीपी संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.