अकोल्यातील तीन महिला बॉक्सरांची आंतरराष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षणासाठी निवड
By Admin | Updated: May 16, 2017 02:06 IST2017-05-16T02:06:13+5:302017-05-16T02:06:13+5:30
पूनम कैथवास, दिया बचे, साक्षी गायधनेचा समावेश

अकोल्यातील तीन महिला बॉक्सरांची आंतरराष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षणासाठी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अनिवासी क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या बॉक्सर दिया बचे, साक्षी गायधने, पूनम कैथवास या तीन युवा महिला बॉक्सरांची निवड मध्यप्रदेशातील भोपाळ येथे भारतीय खेळ प्राधिकरण व भारतीय बॉक्सिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराकरिता निवड झाली आहे.
दिया, साक्षी व पूनम या तिघींनीही महाराष्ट्र, युवा आणि शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील पदक मिळविलेली आहेत. तिघीही वसंत देसाई क्रीडांगण येथील बॉक्सिंग एरिनामध्ये राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्राप्त करीत आहेत. या शिबिरातून तिघीही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकतात.
महाराष्ट्रातून सहा मुलींची निवड या प्रशिक्षण शिबिराकरिता झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक तीन खेळाडू अकोल्याच्या आहेत. या शिबिरात उत्कृष्ट खेळ सुविधा, प्रशिक्षक व उत्कृष्ट अहारासह प्रतिदिन एक हजार रुपये शिबिरार्थींना देण्यात येते. आगामी युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप व युथ कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपकरिता भारतीय संघाची निवड या शिबिरातून करण्यात येणार असल्याची माहिती सतीशचंद्र भट्ट यांनी दिली.