तीन महिलांची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: March 19, 2016 01:57 IST2016-03-19T01:57:48+5:302016-03-19T01:57:48+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयात केली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया; अतिदक्षता कक्षात हलविले.

तीन महिलांची प्रकृती गंभीर
अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये गुरुवारी तीन महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु शस्त्रक्रियेदरम्यान तीनही महिलांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात येते. गुरुवारी सायंकाळी स्त्री रुग्णालयात निंबा येथील शीतल शंकर देशमुख, तार फैलात राहणार्या सविता गेडाम आणि मेहकर तालुक्यातील पिंप्री माळी येथील जया अनिल इंगळे यांच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु शस्त्रक्रियेदरम्यान या तीन महिलांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे महिलांना सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खासदार संजय धोत्रे यांनी अतिदक्षता विभागात जाऊन महिलांच्या प्रकृतीची विचारणा केली आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे सुचविले. यावेळी खासदार धोत्रे यांच्यासोबत भाजपचे अकोला तालुकाध्यक्ष अनिल गावंडे, अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे उपस्थित होते. दरम्यान, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, डॉ. तरंगतुषार वारे यांनी महिला रुग्णांची भेट घेतली.