भरधाव ट्रकची तीन वाहनांना धडक; सहा जण जखमी
By Admin | Updated: July 22, 2016 00:23 IST2016-07-22T00:23:34+5:302016-07-22T00:23:34+5:30
आकोट-अकोला मार्गावरील घटना; ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

भरधाव ट्रकची तीन वाहनांना धडक; सहा जण जखमी
आकोट (जि. अकोला): भरधाव ट्रकने एकाच वेळी एसटी बस, इंडिका कार व मोटारसायकलला धडक दिल्याची घटना २१ जुलै रोजी दुपारी २.३0 वाजता सुमारास घडली. या अपघातात पाच जण किरकोळ तर एक जण गंभीर असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. सदर अपघात हा आकोट-अकोला मार्गावरील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर घडला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध आकोट ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकोट शासकीय धान्य गोदामात धान्य पोहोचवून चालक प्रमोद प्रभाकर थोरात हा एम.एच. ३0 एल २३८३ क्रमांकाचा ट्रक चालवित अकोला येथे जात होता. ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून अकोला येथे जात असलेल्या एम एच ४0 एन ९७८८ क्रमांकाच्या एसटी बस, एम एच ३0 ए टी ७७९ क्रमांकाच्या इंडिका कारला व मोटारसायकल क्रमांक एम एच ३0 टी ४९८२ ला धडक दिली. या विचित्र अपघातात इंडिका कारमधील राजेंद्र विखे, राजेंद्र काकड, प्रवीण वासनकार रा. तेल्हारा हे किरकोळ तर गणेश डांबरे रा.वरवट बकाल हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच मोटारसायकल चालक संतोष प्रभाकर तायडे, अंजली प्रभाकर तायडे रा. मुंडगाव हेसुद्धा किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. छावा संघटनेचे कार्यकर्ते व बोर्डी येथील संतोष खवले या युवकाने सहकार्य केले. या अपघातप्रकरणी एसटी बसचालक शेख शाबीर शेख इस्माईल यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालक प्रमोद प्रभाकर थोरात (रा. आकोट फैल अकोला) याच्याविरुद्ध आकोट ग्रामीण पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, आर. डब्ल्यू. १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.