आकोली जहाँगीर : आकोट तालुक्यातील आकोली जहाँगीर परिसरात १ जूनला झालेल्या वादळामुळे खंडित झालेला थ्री फेजचा विद्युत पुरवठा तीन दिवस उलटूनही व्यवस्थित दुरुस्ती करण्यात आला नाही. परिणामी शेतीतील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकर्यांनी पणज व आकोट येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कंपनीच्या पणज उपकेंद्रांतर्गत आकोली जहाँगीर परिसरात १ जूनला अचानक आलेल्या वादळीवार्यासह पावसाने कहर केला. यामध्ये बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यासोबतच परिसरातील विद्युत तारा व खांबसुद्धा क्षतिग्रस्त झाल्याने तीन दिवसांपासून या भागात थ्री फेजचा वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे बचावलेल्या पिकांचे संगोपन करण्यासाठी कृषीपंपांना विजेची नितांत गरज आहे. पिकांना पाण्याची गरज असताना तीन दिवसांपासून बंद असलेल्या वीज पुरवठय़ामुळे शेतीचे नुकसान होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी पणज उपकेंद्रावर धाव घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, याठिकाणी त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते अधिक संतप्त झाले आणि त्यांनी सरळ आकोट येथील साहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयावर धाव घेऊन आपले गार्हाणे ऐकण्यासाठी ठिय्या दिला. येथे साहाय्यक अभियंता चव्हाण यांनी शेतकर्यांचे म्हणणे ऐकून लगेच वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानुसार आकोली जहाँगीर परिसरातील दुरुस्तीच्या कामास अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून त्वरित सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन त्यांनी शेतकर्यांना दिले.
थ्री फेज लाईन तीन दिवसांपासून बंद
By admin | Updated: June 5, 2014 00:09 IST