कोरोनाचे आणखी तीन बळी; १४ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:16 IST2020-08-19T12:16:47+5:302020-08-19T12:16:55+5:30
आणखी तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४० वर गेला आहे.

कोरोनाचे आणखी तीन बळी; १४ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४० वर
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, १९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४० वर गेला आहे. तर आणखी १४ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३२७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच महिला व नऊ पुरुष आहेत.यामध्ये मुर्तिजापूर येथील पाच व बार्शिटाकळी येथील दोन जणांसह गौरक्षण रोड, गायत्री नगर, पिंजर ता.बार्शिटाकळी, राजणखेड ता.बार्शिटाकळी, हातगाव ता. मुर्तिजापूर व बेलखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
तीघांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या तीघांचा बुधवारी मृत्यू झाला. यामध्ये गुलजारपूरा येथील ३५ वर्षीय महिला, कोठारी-पैलपाडा येथील ६५ वर्षीय पुरुष व तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गुलजारपूरातील महिलेस १६ आॅगस्ट रोजी, पैलपाडा येथील रुग्णास १० आॅगस्ट रोजी, तर बेलखेड येथील रुग्णास १७ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.
४२८ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २७५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.